पुणे: महायुती सरकारचा बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार रविवारी (15 डिसेंबरला) नागपुरात पार पडला. एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळात तब्बल 25 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. दरम्यान शिवसेना आणि भाजपमधून विरोध होत असताना देखील आमदार संजय राठोड यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे, त्यानंतर आता पुण्यात त्यांच्या नावाला विरोध दर्शवण्यात आला आहे,
'राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी' अशा प्रकारचे मजकूर लिहून कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या चेहऱ्यावरती क्रॉसफुली मारून पुण्यात निषेध बॅनर लावण्यात आले आहेत.
एकीकडे स्त्रियांसाठी लाडकी बहीण तर दुसरीकडे एका निष्पाप महिलेच्या हत्येचा आरोप असणाऱ्या आमदारास कॅबिनेट मंत्रीपद असा मजकूर यावर लिहिण्यात आला आहे. बॅनर कोणी लावले त्याचं नाव मात्र यावरती लिहण्यात आलेलं नाही. मात्र, महायुती सरकार हाच का तुमचा न्याय अशा प्रकारचे बॅनर रस्त्याच्या मधोमध पुण्यात लावण्यात आलेले आहेत. या बॅनरमुळे पुण्यात चांगली चर्चा रंगली आहे. दरम्यान मित्रपक्षांसह शिवसेनेतून देखील त्यांच्या नावाला विरोध होत असताना त्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.
काही नावांना विरोध
शिवसेनेकडून 11 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना डच्चू दिला आहे. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये, अशी भाजप पक्षाची देखील आग्रही मागणी होती. वादग्रस्त, आरोप असलेले चेहरे मंत्रिमंडळात नको, अशी चर्चा होती. पण तरीही संजय राठोड यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय राठोड महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. एका मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले होते. हे गंभीर आरोप भाजपकडून करण्यात आले होते. त्यावेळी भाजपनं राठोड यांचा राजीनामा घेतला होता. यावेळी त्यांना मंत्रीपद देऊ नये अशी मागणी होत असताना देखील त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
संजय राठोड हे पाचव्यांदा निवडून आले
संजय दुलीचंद राठोड हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी यावेळी पाचव्यांदा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीत माणिकराव ठाकरे यांचा 28,775 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत त्यांना 143,115 मतं मिळाली. संजय राठोड हे पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ही 2024 विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर ही त्यांची पाचवी टर्म असणार आहे. यापूर्वी त्यांनी 2004, 2009, 2014, 2019 आणि 2024 मध्ये निवडून आले आहेत.