पुणे : नागराज मंजुळेच्या सैराटनं फक्त महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशभरातल्या सिनेरसिकांना याड लावलं. मात्र त्यापैकी एक पठ्ठ्या असाही आहे, ज्यानं एक-दोन वेळा नव्हे, तर तब्बल 105 वेळा सैराट चित्रपट पाहिला आहे.
हनुमंत लोंढे असं या सैराटवेडयाचं नाव आहे. लाँड्रीत काम करणाऱ्या हनुमंतने सैराट प्रदर्शित झाल्यापासून सलग 105 दिवस 105 वेळा पाहिला आहे. 29 एप्रिलपासून 11 ऑगस्टपर्यंत त्यानं थिएटरच्या अक्षरशः वाऱ्या केल्या. महत्त्वाचं म्हणजे 'सैराट'च्या 105 शोची तिकीटंही त्यानं स्वतःजवळ जपून ठेवली आहेत.
36 वर्षीय हनुमंत लोंढे मूळचा सोलापूर जिल्ह्यातील. पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आला आणि लॉन्ड्रीत कामाला सुरुवात केली. चित्रपटाच्या वेडापायी दररोज एक शो किबे थिएटरला पाहिला.
सुरुवातीला त्याने चक्क ब्लॅकमध्ये तिकीट विकत घेतले. त्याला पाहून त्याचे मित्र वेडा म्हणायचे, त्याच्यावर हसायचेही परंतु त्याने हा वेड सोडलं नाही. हनुमंत दिवसाला 300 रुपये कमवतो. त्यापैकी 100 रुपये त्यानं सैराटसाठी खर्च केले आहेत. अशाप्रकारे हनुमंतनं सैराट चित्रपटावर आतापर्यंत 10 हजार रुपये खर्च केले आहेत.
दिग्दर्शक नागराज मंजुळेंना भेटून त्यांच्या एका चित्रपटात छोटासा रोल मिळावा, अशी हनुमंतची इच्छा आहे. त्याचबरोबर त्याच्या पाकिटात बायकोच्या फोटोशेजारी आर्चीचाही फोटो ठेवला आहे.