Rohit Pawar : पुण्यातील दोघांना चिरडलेली घटना ताजी असताना इंदापुरात तहसिलदारांवर हल्ल करून डोळ्यात चटणी टाकण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर घणाघाती हल्ला चढवला आहे. आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता, आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विट करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून हल्ला चढवला आहे. पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला आहे. 






गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही!


रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या!






गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा 


सुप्रिया सुळे यांनीही ट्विट करत गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा, असा टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करुन त्यांना मारहाण केली. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला. हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मिरचीपूड देखील फेकली असे समजते. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाही. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी आहे. तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वतः संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपूर्ण घटनेची पोलीसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध.


इतर महत्वाच्या बातम्या