पुणे : कोरोना प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर होणारी कारवाई सरकारी तिजोरी भरण्यासाठी आहे की सर्वसामन्यांच्या कोरोना पासून दूर ठेवण्यासाठी आहे? पुणे महापालिकेने काढलेल्या एका आदेशामुळे हा प्रश्न पडला आहे. कारण पुणे महापालिका उपायुक्तांना कोरोना प्रतिबंधक नियमांच उल्लंघन करणाऱ्यांकडून दंडवसुलीसाठी थेट 10 लाखांचं टार्गेट दिलं आहे आणि टार्गेट पूर्ण न झाल्यास कारवाईचाही इशारा दिला आहे.
कोरोना प्रतिबंधक नियमांच उल्लंघन करणाऱ्यांकडून दर दिवशी तब्बल दहा लाख रुपये वसुल करण्याचा आदेश पुणे महापालिकेने काढला आहे. महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी त्यासाठी शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांतील सहायक आयुक्तांना पत्र पाठवून हे आदेश दिले आहेत. ठरलेलं टार्गेट पूर्ण न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.
पुण्यात मास्क न घालणाऱ्यांकडून 500 रुपये दंड वसूल करण्यात येतो. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून आतापर्यंत कोट्यवधी रुपये दंडाच्या स्वरुपात वसुल करण्यात आले आहेत. पण लोकांनी नियम पाळावेत हा महापालिकेचा उद्देश आहे का लोकांकडून दंड वसूल करणं हा उद्देश आहे, असा प्रश्न महापालिकेच्या या आदेशामुळे निर्माण झाला आहे.