मुंबई : अनेक वेळा मुलं-मुली एकत्र येतात, त्यांना त्यांची जात माहीत नसते. तरी देखील एकत्र येऊन संसार थाटावा अशी त्यांची इच्छा असते. धर्म, जात बाजूला ठेवून दोघे एकत्र येतात. त्यामुळे प्रत्येक केसला लव्ह जिहाद म्हणू नये असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. हिंदू मुलगी किंवा दलित मुलगी असेल आणि मुलगा मुस्लिम असेल तर धर्मांतर होऊ नये असं माझं मत आहे. ज्यावेळी कायदा बनेल त्यावेळी त्यात अशी तरतूद असावी अशी मागणी त्यांनी केली. माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवलेंनी विविध विषयांवर चर्चा केली.
नीलम गोऱ्हेंवर आठवले काय म्हणाले?
रामदास आठवले म्हणाले की, "निलम गोऱ्हे या आदरणीय नेत्या आहेत. त्या समाजवादी म्हणून निवडून आल्या आहेत. काही वर्षे त्यांनी माझ्या पक्षातही काम केलं आहे. नंतर त्या शिवसेनेत अनेक वर्षे होत्या. उद्धव ठाकरे यांनी त्यांना चार वेळेला एमएलसी दिलेली आहे. आता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेतून उपसभापती बनवलं आहे. त्यांचा अनुभव काय आहे मला माहित नाही. त्यांनी किती मर्सिडीज गाड्या दिल्या आहेत हे माहीत नाही. पण संजय राऊत यांनी जे वक्तव्य केले आहे, महिलेचा अपमान केला ते योग्य नाही."
उद्धव-राज एकत्र येतील का?
उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतील का असं विचारल्यानंतर रामदास आठवले म्हणाले की, "ते एकत्र आले तरी ते कायम एकत्र राहतील असं वाटत नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येतील असं मला वाटत नाही. ते एकत्र आले तरी महाराष्ट्रात दोघांची ताकद नगण्य आहे. राज ठाकरेंच्या एवढ्या मोठ्या सभा होऊनही त्यांचा एक माणूस निवडून येत नाही. आताच्या विधानसभेलाही त्यांचा माणूस निवडून आला नाही. लोकसभेला त्यांनी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्याचा फारसा फायदा झाल्याचा मला दिसत नाही. त्यामुळे राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र आले तरी महायुतीवर परिणाम होणार नाही."
खोटे गुन्हे नोंदवले जाऊ नयेत
इंदापुरातील घटनेवर बोलताना आठवले म्हणाले की, कोणताही गुन्हा खोटा नोंदवला जाऊ नये. अशा घटना घडत असतील तर मी पोलिस अधीक्षकांशी चर्चा करेन. आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण चुकीच्या गोष्टी करू नये. चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचं पाठबळ असायला हवं. असे गुन्हे नोंदवले जाऊ नये यासाठी मी नक्की प्रयत्न करे
परभणी प्रकरणात पोलिसांवर कारवाई करावी
रामदास आठवले म्हणाले की, "संतोष देशमुख यांच्या प्रकरणात वाल्मिक कराडसह सर्व आरोपी पकडले आहेत. पण परभणीमधील घटनेत अजूनही पोलिसांवर कारवाई होत नाही. या सरकारला सत्तेत आणण्यात दलितांचा फार मोठा वाटा आहे. परभणी प्रकरणात एसआयटी नेमली आहे. तरीदेखील दलितांना न्याय मिळत नाही. ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे."
ही बातमी वाचा: