इंदापूर : महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात अर्थात पुण्यात येणार आहेत. इंदापूर तालुक्यातील भवानीनगर इथल्या छत्रपती सहकारी साखर कारखाना परिसरात 20 एप्रिल रोजी राजू शेट्टी यांची जाहीर सभा होणार आहे. एकरकमी एफआरपी मिळावी, भूमी अधिग्रहण कायद्यात बदल करावा, अशा अन्य मागण्यांसाठी राजू शेट्टी इंदापूरला येणार आहेत.
चार वर्षांनी राजू शेट्टी इंदापुरात
शरद पवारांचे एकेकाळचे समर्थक पृथ्वीराज जाचक यांनी ही सभा आयोजित केली आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राजू शेट्टी पहिल्यांदाच शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन सभा घेणार आहेत. याआधी साधारण चार वर्षांपूर्वी दूध आंदोलनासाठी राजू शेट्टी भवानीनगर इथे आले. परंतु त्यावेळी त्यांनी सभा घेतली नव्हती. त्यामुळे 20 एप्रिल रोजी होणाऱ्या जाहीर सभेत एफआरपीच्या मुद्द्यासह आणखी कोणत्या विषयावर राजू शेट्टी भाष्य करणार याकडे शेतकऱ्यांसह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडत स्वाभिमानीचा 'एकला चलो'चा नारा
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळत नसल्याची भावना व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले होतं. कोल्हापुरात 5 एप्रिल रोजी झालेल्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांनी याची घोषणा केली होती. महाविकास आघाडीतून बाहेर पडताना त्यांनी 'एकला चलो'चा नारा दिला. तसंच आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या