Devendra Fadnavis on Raju Shetti : राजू शेट्टींनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा योग्य आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. राजू शेट्टींचा महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा होता. कारण राजू शेट्टी यांचे संपूर्ण राजकारण हे सत्तेच्या विरोधात लढण्याचे असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्य सरकारसोबत शेट्टी गेल्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण झाला असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला शेट्टी यांनी विरोध केल्यामुळे लोक त्यांचे मागे गेले होते, असेही फडणवीस म्हणाले. मात्र, शेट्टी त्यांच्याच सोबत गेले म्हणून त्यांच्या प्रतिमेवर प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसने संपवण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस म्हणाले. पण आता राजू शेट्टी यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत असल्याचं त्यांनी सांगितले. राजू शेट्टी  थर्ड फ्रंट उभा करतील किंवा फोर्थ फ्रंट
 उभा करतील किंवा आमच्या विरोधात बोलतील, पण त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीने संपवण्याचा प्रय्तन केला होता असेही ते म्हणाले. मात्र, आता राजू शेट्टींच्या लक्षात आले आहे. 


यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवरही निशाणा लगावला. मनसे ही भाजपची सी टीम असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आली होती. त्यांच्या या टिकेलाही देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. माझा शिवसेनेला सवाल आहे की, शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. एक मुख्यमंत्रीपद घेऊन तुम्ही पक्षाची काय अवस्था केली आहे. आपल ठेवायचा झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून हे जरा बंद करा असा टोलाही फडणवीसांनी सेनेला लगावला. तसेच भोंग्याबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. त्याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणतीही कारवाई केली नाही. ही सरकारची जबाबदारी असल्याचे फडणवीस म्हणाले. 


राजू शेट्टींची घोषणा


महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेब यांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवार साहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला. तिन्ही पक्षातील नेत्यांची दिल्लीत भूमिका वेगळी दिसते. मुख्यमंत्री निवडीच्या वेळी सूचक म्हणून मी चालतो पण शेतकऱ्यांच्या बाबतीत निर्णय घेताना साधं विचारलं देखील जात नाही असे राजू शेट्टी म्हणाले. ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी काहीही संबंध नसलेले लोक घेतले. आमदाराच्या पुढ्यात बोलणार नाहीत ते कारखानदार यांच्यासमोर काय बोलतील. एकरकमी एफआरपी देणे शक्य नाही अशा समितीच्या अहवालावरून निती आयोगाने एफआरपीचे तुकडे करण्याबाबत निर्णय घेण्याचं सांगितलं. निती आयोगाने सांगितलेल्या सूचनापेक्षा महाविकास आघाडी सरकारने आणखी कडक भूमिका घेतली. महाविकास आघाडी सरकारने ठरविलेल्या किमान समान कार्यक्रमाच्या संदर्भात काम केलेलं नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर नाराज असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.  नआगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. 


महत्त्वाच्या बातम्या: