Sharad Pawar vs Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवत ते नास्तिक असल्याचं म्हटलं होत. आपल्या या सभेत राज ठाकरे यांनी शरद पवार हे नास्तिक असून त्यांचा क्वचितच तुम्हाला एखाद्या मंदिरातील फोटो दिसले, असं म्हणाले होते. तसेच  शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाला खतपाणी घातलं, असल्याचा आरोपही त्यांनी आपल्या सभेत केला होता. यावरच आता आमदार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांनी राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 


राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले आहेत की, मी संत गाडगेबाबांचा अभ्यास केलाय, त्यांची अनेक पुस्तकं वाचलीत. गाडगेबाबांनी अनेक घाट उभारले, झाडले..धर्मशाळा बांधल्या. गाडगेबाबा मंदिरात जात होते की, नव्हते हे कुणाला माहिती नाही. त्यामुळे त्यांना आस्तिक म्हणायचे की नास्तिक हे, आपल्याला ठरवावं लागेल. तसेच शरद पवार आहेत.  राज्यातील अनेक मंदिरांच्या विकासात त्यांचा सहभाग आहे. बारामतीतही त्यांनी जिर्णोद्धार केलेली अनेक मंदिरे आहेत. आमच्या सर्व निवडणुकांचा प्रचार कन्हेरीतून होतो. 67 पासून ही परंपरा माझी जपली जात आहे. बऱ्याचदा त्यांची पावले या मंदिराकडे वळलेली आम्ही पाहत आलोय. वेळ असेल तेव्हा मंदिरात दर्शनासाठी जातात. असं असताना त्यांना आस्तिक म्हणायचं की नास्तिक हे आपल्याला ठरवावं लागेल. एखाद्यानं भगवं वस्त्र परिधान केलं किंवा भगवा गंध लावला. धार्मिक वस्त्र परिधान केले म्हणजेच आस्तिक होतो, असं मला वाटत नाही.


दरम्यान, राज ठाकरे यांच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिल आहे. बुधवारी पत्रकार परिषद घेत त्यांनी राज ठाकरे यांच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसेच मी नास्तिक आहे की नाही हे सांगताना माझ्या धर्माचं प्रदर्शन मी करत नाही, असं ही ते म्हणाले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: