Rahul Bajaj : ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज  यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यविधीसाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,खासदार सुप्रिया सुळे,खासदार श्रीरंग बारणे,योगगुरू रामदेवबाबा उपस्थित होते. राहुल बजाज पद्ममभूषण पुरस्काराने सन्मानित असल्याने त्यांना पोलिसांनी सलामी दिली. 


शासनाच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वर्गीय पद्मभूषण राहुल बजाज यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार सुप्रिया सुळे,  पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख,   पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनीही स्वर्गीय बजाज  यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. स्वर्गीय बजाज  यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संजय आसवले, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह उद्योग, कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. 
 
अंत्यसंस्काराआधी राहुल बजाज यांचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी आकुर्डीतील बजाज कंपनी येथे असलेल्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजकारणी, उद्योगपती त्यांच्या निवासस्थानी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, राज्याचे  पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे, साताराचे खासदार श्रीनिवास पाटील, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे सरचिटणीस मिलिंद नार्वेकर आणि इतर उद्योगपती यांनी बजाज यांना श्रद्धांजली अर्पण केली. बजाज कंपनीतील कामगारांनीही राहुल बजाज यांचे अखेरचे दर्शन घेतले. ज्या व्यक्तीमुळे रोजगार मिळाला त्या व्यक्तीस निरोप देताना सगळे कामगार भावुक झाले होते. 


 






मागील दोन महिन्यापासून आजारी असल्यामुळे राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. वाढते वय आणि हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  राहुल बजाज यांनी वाहन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जवळपास पाच दशकांपर्यंत राहुल बजाज यांनी बजाज ग्रुपचे चेअरमनपद यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. वाहन क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत 2001 मध्ये भारत सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं.  विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत 'बजाज ऑटो' (Bajaj) कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवलं.


जन्म - 
10 जून 1938 रोजी कोलकाता येथील एका मारवाडी कुटुंबात राहुल बजाज यांचा जन्म झाला. घरात व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे राहुल बजाज यांनीही उद्योगक्षेत्रात काम सुरु केलं. अल्पवधीत राहुल बजाज यांनी आपला ठसा उमटवला.