पुणे : दुधीचा रस प्यायल्यानंतर पुण्यात 41 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोणत्याही आजाराची पार्श्वभूमी नसताना झालेल्या अपमृत्यूमुळे काळजी व्यक्त केली जात आहे.

दुधीचा रस पिण्यापूर्वी सावधानता बाळगण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.

संबंधित महिलेने 12 जून रोजी ग्लासभर दुधीचा रस प्यायला. अर्ध्या तासातच तिला उलट्या आणि जुलाब यांचा त्रास सुरु झाला. तीन दिवसात तिची प्रकृती आणखी खालावत गेली. 16 जूनच्या मध्यरात्री शरीरांतर्गत गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.

दुधीचा रस प्यायल्यानंतर मळमळ, उलट्या इथपासून मृत्यू होण्याच्या घटनाही देशभरात समोर आल्या आहेत. दुधीचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये, असं इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या समितीने 2011 मध्ये सांगितलं आहे. कडू दुधीतील काही संयुगांमुळे मृत्यू ओढावू शकतो, असं या समितीने सांगितलं होतं.

प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांनाही काही वर्षांपूर्वी दुधीचा रस प्यायल्यानंतर त्रास झाला होता. सुदैवाने त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा झाली.