पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील महात्मा फुले शाळेचे विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी त्रस्त असताना भाजप आणि शिवसेनेचे नगरसेवक बिर्याणी फस्त करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आलं. फुले शाळा नव्या इमारतीत स्थलांतर करून, नियोजित पोलीस आयुक्तालय तिथे उभारण्यात येणार आहे.


याला विरोध दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट महापालिकेतच शाळा भरवत, तिथेच प्रार्थना आणि भोजनही केलं. भविष्य घडवण्यासाठी मुखात अभ्यासाचे धडे येण्याऐवजी, या विद्यार्थ्यांवर घोषणाबाजी करण्याची वेळ आली. तर दुसरीकडे महापालिकेच्या विधी समिती कक्षात भाजप-शिवसेना नगरसेवक बिर्याणीवर ताव मारत होते.

विधी समिती सभापती मोनाताई कुलकर्णी, माजी विधी समिती सभापती शारदा सोनवणे, उषा मुंडे या भाजपच्या नगरसेविका तर प्रमोद कुटे आणि निलेश बारणे हे शिवसेनेचे नगरसेवक बिर्याणी खाताना कॅमेऱ्यात कैद झाले. तर शीतल शिंदे आणि तुषार कामठे हे भाजप नगरसेवक तिथे उपस्थित होते.

भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांनी ही बिर्याणीची पार्टी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान, हे चुकीचं असून असा प्रकार झालाच नाही, असं सुरुवातीला स्पष्ट करणाऱ्या मोनाताई यांनी नंतर कुणाचा तरी वाढदिवस साजरा झाला असेल, ते मी सांगू शकत नाही. वाढदिवस साजरा करायला कोणाची हरकत नसावी. पण हे आंदोलन करणं चुकीचं आहे. शिक्षणापासून आम्ही नाही, तर आंदोलन घडवणारे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहेत, असं त्या म्हणाल्या.