Pune Weather :  मागील काही दिवसांपासून पुण्यात ऊन आणि पावसाचा खेळ सुरु होता. त्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. परिणामी पावसामुळे शेतकऱ्यांचंही नुकसान झालं मात्र आता येत्या काही दिवसात पुण्यात खऱ्या उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. पुणे शहराच्या तापमानाच चांगली वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. त्यामुळे उन्हापासून पुणेकरांनी काळजी घ्यावी,असं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. 


भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार बुधवारी शहरातील शिवाजीनगर येथे 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांत तापमानात वाढ होऊ शकते आणि शहरात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मे महिन्यात प्रथमच शिवाजीनगरमध्ये तापमान 40.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते, तर शहरातील इतर अनेक भागात 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. ठमढेरे परिसरात 42.9 अंश सेल्सिअस तर कोरेगाव पार्कमध्ये 42.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


यापूर्वी मे महिन्यात सलग सात दिवस तापमान सामान्यपेक्षा कमी होते. मंगळवारी शिवाजीनगर परिसरात 36.5अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून ते सामान्यपेक्षा 1.3 अंश सेल्सिअसने कमी होते. मात्र, बुधवारी तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ झाली, जी सामान्यपेक्षा 2.3 अंश सेल्सिअसने जास्त होती. नागरिकांना सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि स्वतःला हायड्रेट ठेवण्याचे आवाहन हवामान खात्यानं केलं आहे. 


हिट वेव्ह नाही मात्र तापमान वाढण्याची शक्यता...


तापमान वाढत असल्याने पुण्यात हिट वेव्ह येणार का?, असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला होता. मात्र अशी कोणत्याही प्रकारची हिट वेव्ह येणार नसल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आेहे. मात्र तसं असलं तरीही पारा वाढणार आहे. किमान तापमान  42 अशं सेल्सियसपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 


कोणत्या परिसरात किती तापमान?


शिवाजीनगर – 40.1
डेक्कन जिमखाना – 40.1
लोहेगाव – 40.1
चिंचवड – 41.8
लव्हळे – 41.8
मगरपट्टा – 40.9


उन्हात जाताना कोणती काळजी घ्याल?


-फार महत्वाचं काम नसल्यास घराबाहेर पडू नये.
- कापडी स्कार्फ बांधूनच घराच्या बाहेर पडा.
- पुरेसं पाणी पीत रहा.
- सुती कपड्यांचा वापर करा
- उन्हातून घरी आल्यावर लगेच पाणी पिऊ नका.
- उपाशीपोटी घराबाहेर पडू नका
- तळलेले आणि तुपकट पदार्थ टाळा.
- गॉगल, टोपी, रुमाल, छत्री यांचा वापर करा.