Indapur Crime News :  ढाब्यावर जेवण करून (Indapur crime) ट्रकमध्ये झोपलेल्या चालकाचे अपहरण (Kidnap) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे पुणे सोलापूर हायवेवर ट्रकमधून माल घेवून निघालेल्या ट्रकच्या चालकाचे जबरदस्तीने अपहरण करून वाहनातून सुमारे 35 लाख रुपयांचे लोखंडी राॅड दरोडा टाकून लुटणाऱ्या टोळीला बारामती तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिग्विजय श्रीकांत जाधव, लक्ष्मण भीमराव कुचेकर, सुहास रावसाहेब थोरात, प्रथमेश मनोज शेलार, मयुर प्रकाश शिंदे व स्वप्निल दत्तात्रय निंबाळकर अशी पोलिसांनी अटक केलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. 


या प्रकरणी मारुती मोतीलाल करांडे यांनी फिर्याद दिली होती. मंगळवारी मारुती करांडे हे स्वतःच्या मालकीचा ट्रकमधून बारामती एमआयडीसीतील माऊली कृपा ट्रान्सपोर्टतर्फे कर्नाटक येथून लोखंडी राॅड भरून पुण्यात मुंढवा येथील भारत फोर्जमध्ये घेवून जाण्यासाठी निघाले होते. इंदापूर तालुक्यातील भिगवणजवळ बबिता ढाबा येथे पहाटे तीन च्या सुमारास जेवणासाठी थांबले. जेवण झाल्यावर ते गाडीतच झोपले असताना दरवाजा उघडून तिघांनी आत येत त्यांना दमदाटी करत चार हजार रुपये आणि मोबाईल काढून घेतला. त्यानंतर ट्रेलर चालू करून तो बारामतीच्या दिशेने आणला.


भिगवणमध्ये त्यांना आणखी तीन साथीदार मिळाले. त्यांनी या ट्रकमधून 35 लाख रुपये किमतीचे लोखंडी राॅड चोरले. तसेच 19 लाख रुपयांचे वाहनही त्यांनी नेले. करांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दरोड्याचा आणि जबरी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पथके रवाना केली. बारामती तालुक्यातील कन्हेरी गावच्या हद्दीत पालखी महामार्गालगत त्यांनी हे वाहन आणले. तेथून दुसऱ्या वाहनात हे राॅड टाकून ते दुसरीकडे नेऊन विकण्याचा त्यांचा हेतू होता. 


पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु असतानाच ट्रेलरसह दोन दरोडेखोरांना जागीच पकडण्यात आले. त्यांच्याकडून इतर साथीदारांची माहिती घेत आजूबाजूच्या झाडाझुडपात लपून बसलेल्या अन्य चार जणांना पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले. बारामती न्यायालयाने या सहा जणांना 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी यासारखे आणखी काही गंभीर गुन्हे केले आहेत का? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. मागील काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. ही गुन्हेगारी रोखणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.