Farmer Success Stories  : मागील काही महिन्यापासून पारंपारिक शेती न करता शेतकरी आपल्या शेतात प्रयोग करताना दिसत आहे. याच प्रयोगातून लाखो रुपय़ांचा नफादेखील मिळवताना दिसत आहे. दौंड तालुक्यातील कुसेगाव येथील विनोद शितोळे यांनी खरबूज पिकाची लागवड केली. 18 गुंठ्यात शितोळे यांनी तब्बल 1लाख 45 हजारांचे उत्पादन घेतले आहे. शितोळे यांना शेतात वांग्याची रोपे लावायची होती. मात्र नर्सरित रोपे मिळाली नाहीत म्हणून त्यांनी खरबूज लावण्याचा निर्णय घेतला. 18 गुंठ्यांत 3 हजार कुंदन जातीची रोपे लावली.


90 दिवसात शितोळे यांना 5 टन उत्पादन मिळाले. शितोळे यांनी खरबूज मार्केटमध्ये न नेता जवळपासच्या फळ विक्रेत्यांना विक्री केली. खरबुजाची विक्री मार्केटला केली असती तर शितोळे यांना 20 ते 22 रुपये प्रति किलो दर मिळाला असता. मात्र त्यांनी थेट फळ विक्रेत्यांना खरबूजाची विक्री केल्याने 25 रुपये दर मिळाला. शितोळे यांना 18 गुंठ्यांत 35 हजार रुपये खर्च आला. खर्च वजा जाता शितोळे यांना 1 लाख 10 हजार निव्वळ नफा मिळाला आहे. याच अठरा गुठे क्षेत्रात कोणत्याही प्रकारची शेतीची मशागत न करता शितोळे हे दोडका पिकाची लागवड करणार आहेत.


शितोळे सांगतात की, यंदा वांग्याची लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी बेडही तयार केले होते. मात्र वांग्याची रोपं मिळाली नाही त्यानंतर त्यांनी आणि मित्राने मिळून खरबूज लावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 3 हजार रोपं घेतली आणि 18 गुंठ्यात या रोपांची लागवड केली. त्यातून भरपूर नफा झाल्याचं ते सांगतात. 


बाजारपेठात चांगली मागणी


कुंदन जातीच्या खरबूजाला बाजारात चांगली मागणी आहे. त्यामुळे बाजरात चांगला प्रतिसाद मिळाला. पाच टन खरबूजाची विक्री केली. पाटस, सुपा, वरवंट, यवत, चौफुला या गावातील फळ विक्रेत्यांकडे विक्री केली होती. फळ विक्रेत्यांचादेखील चांगला प्रतिसाद मिळाला. ज्या फळविक्रेत्यांकडून माल विकला जात होता. ते फळ विक्रेते संपर्क साधून मालाची मागणी करत होते. 


किंमत जास्त मिळाल्याने फळ विक्रेत्यांना विकले खरबूज


गावापासून पुण्याची बाजारपेठ जवळ आहे. मात्र या बाजारपेठेत पुरेशी किंमत मिळाली नसती. त्यामुळे शितोळे यांनी हा माल फळविक्रेत्यांना विक्री करण्याचा निर्णय घेतला. बाजारपेठेत  20 ते 22 रुपये प्रति किलो दर मिळाला असता मात्र त्यांना 25 रुपये प्रतिकिलो दराने फळविक्रेत्यांना विकता आला.