Valentine Day 2023आमच्या काळी प्रेम वगैरे अशी काही पद्धत नव्हती. सुरुवातीला घरचे पत्रिका बघायचे. त्यांना आवडलं तर लग्न करायचे आणि थेट समोर असलेल्या मुलीच्या प्रेमात पडायचं असं सगळं आमच्या काळात चालायचं. मात्र त्यावेळच्या प्रेमाची मजा वेगळी होती. त्यावेळी प्रेम शब्दांत व्यक्त करावं लागत नव्हतं तर ते कृतीतून दाखवावं लागत होतं, असं पुण्यातील 91वर्षीय श्रीपाद बुरसे सांगतात


श्रीपाद बुरसे आणि मंगला बुरसे हे पुण्यात राहतात.  श्रीपाद बुरसे हे 91 वर्षांचे आहेत तर त्यांच्या पत्नी मंगला बुरसे 88 वर्षांच्या आहेत. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, ती जगावी लागते आणि निभवावी लागते. त्या दोघांच्या लग्नाला 65 वर्ष झाली आहेत. 65 वर्षांच्या संसारात अनेकदा प्रेम व्यक्त करायची संधी मिळाली असं ते सांगतात पण मुळात प्रेम व्यक्त करायची वेळच येऊ नये, असं त्यांनी सांगितलं. व्हॅलेंटाईन डे निमित्त आजी-आजोबांनी सुखी संसाराचे काही सिक्रेट्सदेखील सांगितले आहेत. 


91 वर्षीय आजोबांनी एबीपी माझाशी बोलताना त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगितली आहे. ते म्हणातात की, आमच्या काळात प्रेम वगरे काही नव्हतं. घरचे सगळं ठरवायचे. त्यानंतर थेट लग्न करायचं. मंगला यांची पत्रिका घेऊन त्यांचे मामा बुरसे कुटुंबियांकडे गेले होते. त्यानंतर नातेवाईकांमधील स्थळ असल्याने घरच्यांनी दोघांचं लग्न ठरवलं. त्यानंतर लग्नाला आता 65 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यामुळे प्रेम झालं म्हणून लग्न झालं, असं त्याकाळी काहीही नव्हतं, असं ते सांगतात. 


प्रेम व्यक्त कसं केलं?


प्रेम हे शब्दांत नाही तर कृतीतून व्यक्त करायला लागायचं. मंगला श्रीपाद यांना आवडणारी भाजी करायच्या. सणावाराला ते म्हणतील तसा स्वयंपाक करायचा. नटायचं. एकदा शनिवार वाड्यात फिरायला गेलो होतो तेव्हा मी यांच्याकडे भेळ खाण्याचा हट्ट केला होता. मात्र चार पाच दिवस यांनी मला भेळ खायला घातली नव्हती. त्यावेळी मी रुसून घरी निघून गेले होते आणि मुलांना घेऊन थेट बागेत गेले होते. त्यावेळी फार रुसले होते. मात्र त्यावेळचा रुसवा फार काळ टिकत नव्हता. येता जाता एकमेकांवर नजर पडली थोडं हसलं की रुसवा निघून जायचा. आम्ही कधीच एकमेकांवरचं प्रेम व्यक्त केलं नाही.  65 वर्षांच्या संसारात प्रेम बोलून तर कधीच दाखवलं नाही,  असं 88 वर्षीय मंगला बुरसे सांगतात.


मंगला शिवाय मला दोन दिवसही करमत नव्हतं...


मंगलाचं माहेर सासवडला होतं. काही कामानिमित्त माहेरी गेली की लगेच दोन दिवसात तिला परत आणायला जायचो. त्यावेळी आमचे सासरे म्हणायचे की, दोन दिवस झाले. मंगलालाची आठवण येते त्यावेळी मी  असं सांगू शकत नव्हतो. म्हणून मी जेवणाची पंचाईत होते, असं कारण देत मंगलाला माझ्याकडे घेऊन यायचो. 


आय लव्ह यू म्हणायची वेळ का येते?


प्रेम ही दाखवायाची किंवा बोलायची भावना नसून ती कृतीकृत व्यक्त करण्याची भावना आहे. त्यामुळे आवडीचा गोड पदार्थ, आवडीची भाजी, एखाद्या सणाला साडी, घरच्यासमोर नजरानजर झाली तर एकमेकांकडे पाहून हसणं हे याला प्रेम म्हणतात. आता प्रेम म्हटलं की, आय लव्ह यू एवढंच असतं. त्यामागच्या अनेक गोष्टी व्यक्त केल्या जात नाहीत, असं श्रीपाद सांगतात.