Nashik Pune highway Accident :  पुणे शहरात (Pune Accident News) अपघाताचं सत्र संपताना दिसत नाही आहे. अपघातच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.  पुणे नाशिक महामार्गावरील खेड तालुक्यातील शिरोली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. महामार्ग ओलांडताना एका चारचाकी गाडीने धडक दिल्यानं ही घटना घडलेली आहे. यात पाच महिलांचा  मृत्यू झाला आहे. 13 महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहे. ही घटना काल रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. 


एका लग्नकार्यात काम करण्यासाठी 17 ते 18 महिला स्वारगेटवरून पीएमपीएमएल बसने खेड तालुक्यात आल्या होत्या. शिरोली फाट्याजवळ त्या उतरल्या, मात्र अंधारात त्यांना महामार्ग ओलांडायचा होता. पुण्याच्या दिशेने आलेल्या चारचाकीने आधी एका महिलेला धडक दिली. त्यानंतर गाडीवरचा ताबा सुटला आणि इतर सात महिलांना ही त्याने धडक दिली. 13 महिला जखमी झालेल्या महिलांवर उपचार सुरु आहे. यातील काही महिला गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय 46) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत.


लग्नाच्या कार्यासाठी आल्या होत्या महिला


खरपुडी फाट्यावर असणाऱ्या मंगल कार्यालयात या 18 महिला लग्न कार्यक्रमात वाढपी आणि स्वयंपाक कामासाठी आल्या होत्या. या सगळ्या महिला पुण्यातील नसून पुण्याच्या आजूबाजूच्या गावातील आहेत. मंगल कार्यालय रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूने असल्याने त्या रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी या महिसांचा दुर्दैवी अपघात झाला आहे. या महामार्गावरील अपघातात पाच महिलांना चिरडून चालक पसार झाला आहे. रात्रीची वेळ असल्याने पसार होण्यात चालक यशस्वी झाला मात्र खेड पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. 


अपघात कधी थांबणार?


पुणे जिल्ह्यात अपघाताच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. रोज अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यात अनेकांचे नाहक जीव जात आहेत. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेग, रस्ते या अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचं आतापर्यंतच्या अपघातातून समोर आलं आहे. योग्य उपाययोजना राबवून हे अपघात रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे.