Pune Valentine Day 2023 : 'व्हॅलेंटाईन डे' (pune) हा प्रेमाचा Valentine Day 2023 दिवस असतो. प्रेम व्यक्त करण्याचा दिवस असतो. याच स्पेशल दिवशी फक्त प्रेम व्यक्त करायचं नाही तर आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय पुण्यातील अनेक तरुणांनी घेतल्याचं दिसत आहे. पुण्यातील अनेक लग्नाळू तरुण-तरुणींनी लग्नासाठी व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त ठरवला आहे. विवाह नोंदणी कार्यालयात लग्न करणार्या जोडप्यांची गर्दी पहायला मिळत आहे.
40 जोडपे करणार विवाह
प्रेमाचा दिवस स्पेशलच नाही तर आयुष्यभराची साथ देणारा असावा. हा विचार करुन अनेक तरुणांनी आज विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रमाणे पुण्यातील विवाह केंद्रावर तरुण तरुणींची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. या केंद्रावर तब्बल चाळीस जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेचा मुहुर्त साधत आज विवाह करायचं ठरवलं आहे. या जोडप्यांना लगेच जागेवर विवाह प्रमाणपत्र देण्याची तयारी विवाह नोंदणी कार्यालयाने केली.
व्हॅलेंटाईन डे असल्याने शहरात सगळीकडे उत्साहाचं वातावरण आहे. अनेक प्रेमीयुगुलांनी त्यांचे वेगवेगळे प्लॅन आखले आहेत. त्यासाठी पुण्यातील अनेक ठिकाणंदेखील सजले आहेत. हा स्पेशल दिवस स्पेशल करण्यासाठी अनेक तरुण तरुणींचा प्रयत्न असतो. त्यासाठी अनेक तरुण आपल्या प्रेयसीला स्पेशल ठिकाणी घेऊन जात चांगलं सेलिब्रेशन करत असतात. मात्र काही तरुणांनी थेट या दिवशी लग्नच करण्याचा निर्णय घेतला आहे. चाळीस जोडप्यांनी आतापर्यंत लग्नासाठी अर्ज केला आहे. दिवसभर अर्ज करणाऱ्या जोडप्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ऐनवेळेस लग्न करण्यासाठी येत असलेली जोडपी पाहता आज साठ ते सत्तर विवाह होतील असा अंदाज आहे.
कुटुंबीयदेखील उपस्थित
विवाह नोंदणी केद्रांवर जोडप्यांची गर्दी बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांचीदेखील उपस्थिती आहे. अनेक जोडपे विवाहासाठी उत्सुक असल्याचं बघायला मिळत आहे. त्यांच्यासोबतच त्यांचे कुटुंबीयदेखील उत्सुक आहेत. मित्र आणि कुटुंबीयांच्या साक्षीने ही जोडपे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी विवाहबंधणात अडकणार आहेत.
पंचाग, मुहूर्त सोडून व्हॅलेंटाईन डे ला पसंती
विवाह सोहळा म्हटलं की, पंचांग आणि मुहूर्त बघितले जातात. तो मुहूर्त न चुकता पाळला जातो. मात्र या नव्या पीढीचा मुहूर्तापेक्षा प्रेमाच्या दिवसाला विवाह करण्याकडे कल दिसत आहे. जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डे हा विवाहासाठी मुहूर्त ठरवला आहे. त्यासाठीच विवाह नोंदणी केंद्रावर गर्दी बघायला मिळत आहे शिवाय उत्साहाचं वातावरणदेखील दिसत आहे.