Pune Sppu News :  नवीन वर्ष सुरु होताना अनेक लोक अनेक संकल्प करत असतात. फिटनेसवर लक्ष देणार, हा संकल्प सगळेच करतात. मात्र अनेकांचा हा संकल्प पूर्ण होत नाही. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळातर्फे योग प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. दोन जानेवारीपासून अभ्यासक्रमाची अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. 


कोणाला करता येणार अर्ज?
इयत्ता बारावी उत्तीर्ण व्यक्तींना अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा आहे. दोन जानेवारीपासून प्रवेश अर्ज सुरु होणार आहे. 14 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. वय वर्ष 18 पूर्ण ते 60 वर्षापर्यंत कोणीही या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. 


50 विद्यार्थ्यांनाच मिळणार संधी
अभ्यासक्रमासाठी 50 जागा आहेत. प्रथम प्रवेश घेणाऱ्या व्यक्तीस प्रथम प्राधान्य यानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी भारतीय, तसेच परदेशी विद्यार्थीही अर्ज करू शकतात, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आलं आहे. अभ्यासक्रमाबाबतची अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या www.unipune.ac.in  या वेबसाइटवर पाहता येणार आहे, अशी माहिती क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दिपक माने यांनी दिली. 


अभ्यासक्रमात योगाभ्यासावर लक्ष केंद्रित केले जाणार असून, विविध आसने, त्यांचे उपयोग, शारीरिक तद्दरूस्तीच्या दृष्टीने असलेले महत्व विद्यार्थाना समजावून सांगितले जाणार आहे. विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळणार असल्याने रोजगाराच्या दृष्टीनेही हा अभ्यासक्रम महत्त्वाचा असणार आहे. 


विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रम-


पुणे विद्यापीठात क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळातर्फे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहे. त्यासोबतच मानसशास्त्रचादेखील अभ्याक्रमाला भरपूर प्रमाणात स्कोप आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाबरोबरच या अभ्यासक्रमांना देखील प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. 


कोरोनात कळलं फिटनेसचं महत्व-


लगबगीच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेण्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकांना कमी वयातच शारिरीक त्रास व्हायला सुरुवात होते. त्याउलट पहिलं तर अनेक लोक कोरोनानंतर फिटनेस फ्रिकदेखील झाल्याचं बघायला मिळालं. कोरोनात अनेकांना उत्तम स्वास्थ्याचं महत्व समजलं आणि स्वत:च्या शरिराचंदेखील महत्व कळलं त्यामुळे अनेक लोक फिटनेस आणि सायकलिंगकडे पुन्हा वळले. पारंपारिक व्यायामांवर भर दिला तर अनेकांनी जीम, योगा किंवा सायकलिंगवर भर दिला. त्यामुळे अनेकांना तंदुरुस्त राहण्यास मदत झाली.