पूणे : गेल्या काही दिवसात वाहतूक पोलिसांवर अरेरावी करणाऱ्या आणि दंडाची रक्कम भरण्यास नकार देणाऱ्याची संख्या वाढली आहे. तसेच कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर हल्ला होण्याच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आपलं कर्तव्य करताना वाहतूक पोलिसांना आपला जीव मुठीत धरुन काम करावं लागतं आहे. पुण्यातही असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडलाय. आधीच्या थकलेल्या वाहतूक नियमभंगाच्या दंडाची 400 रुपयांची रक्कम भरायला सांगितल्यानंतर एका कार चालकाने वाहतूक पोलीस हवालदार यांच्या अंगावर गाडी घातली आणि त्यांना 700 ते 800 मीटरपर्यंत फरफटत नेलं. 


पुण्यातील मुंढवा सिग्नल चौकात शुक्रवारी दुपारी सव्वाचारच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी पुण्यातील मुंढवा पोलिसांनी कार चालक प्रशांत श्रीधर कांतावर याला अटक केली आहे. पोलिसांनी प्रशांत कांतावर याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहायक पोलीस निरीक्षक राजगुरु यांच्या देखरेखीखाली पोलीस हवालदार शेषराव जायभाय व त्यांचे सहकारी वाहनांवरील पूर्वीच्या ऑनलाईन खटल्यांची दंडाची रक्कम वसुल करण्यासाठी कारवाई करत होते. त्यावेळी मुंढवा सिग्नल चौकात प्रशांत कांतावर हा कार घेऊन आला. तेव्हा पोलीस हवालदार शेषराव जायभाय यांनी प्रशांत कांतावर याच्या गाडीवर पूर्वीचा 400 रुपयांचा दंड आहे आणि तो भरण्यास सांगितले. तेव्हा कांतावर याने दंडाची रक्कम न भरता जायभाय यांच्या अंगावर जीवे मारण्याच्या हेतूने गाडी घातली. जायभाय हे गाडीच्या बोनेटवर पडले असताना तशाच स्थितीत ती गाडी जवळपास 700 ते 800 मीटरपर्यंत फरफटत नेले. 


पुण्यामध्ये वाहतूक पोलिसांच्या कारवाईला प्रतिसाद न देता त्यांच्यावर जीवघेणे हल्ले करण्याच्या घटना वाढत आहेत. गेल्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. 


संबंधित बातम्या :