Thane Traffic Issue : ठाणे (Thane), नवी मुंबई (Navi Mumbai) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एक अजब उपाय शोधण्यात आला आहे. यानुसार जेएनपीटी बंदरातून ये-जा करणाऱ्या ट्रेलर्सना यापुढे कलर कोड लावण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल (बुधावारी) जेएनपीटी बंदराची पाहणी केली आणि वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोऑर्डिनेशन टीमही तयार करण्यात आल्याचं सांगितलं. जेएनपीटी बंदरात ये-जा करणाऱ्या ट्रेलर्समुळे ठाणे, घोडबंदर, कळंबोली, मुंब्रा आणि भिवंडी या परीसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 


वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी घेतलेल्या अजब निर्णयाबाबत बोलताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "रस्त्यावरची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या वाहतुकीचं नियमन केलं तर नक्कीच रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालता येईल. त्यासाठी जेएनपीटीच्या माध्यमातून कलर कोड स्टिकर्स, म्हणजेच, अहमदाबाद, पुणे, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना ते स्टिकर्स देण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनाही ती गाडी ओळखणं सोपं जाईल आणि वेळ जाणार नाही."


पालकमंत्र्यांच्या दौऱ्याचा काय परिणाम? एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक 


मुंबई नाशिक हायवे आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवर रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे. त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी दौऱ्यात प्रसारमाध्यमांसमोर एमएमआरडी, एएमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम खातं आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रचंड खडसावले होतं. आठ दिवसांच्या आत सर्व रस्ते गाडी चालवण्या लायक होतील, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलं होतं. त्यानंतर ताबडतोब कार्यतत्परता दाखवत सगळ्याच सरकारी विभागांनी आणि ठेकेदारांनी डांबरीकरण करून रस्ते चकाचक केल्याचं दाखवलं होतं. मात्र गेले दोन दिवस होत असलेल्या पावसात हेच सर्व रस्ते पुन्हा एकदा वाहून गेले आहेत आणि परिस्थिती आधीपेक्षा देखील भयंकर झाली आहे. त्यमुळे एबीपी माझानं पालकमंत्र्यांनी केलेल्या दौऱ्याचा काही परिणाम झाला का? हे पडताळून पाहण्यासाठी ठाण्यातील रस्त्यांचा रियालिटी चेक करण्याचं ठरवलं. पालकमंत्र्यांनी पाहणी केलेल्या प्रत्येक रस्त्यावर आम्ही गेलो.


पाहा व्हिडीओ : Thane Potholes : Eknath Shinde यांच्या पाहणीनंतरही रस्ते जैसे थेच; रस्त्यांच्या कामाचा Reality Check



रिअॅलिटी चेकची सुरुवात घोडबंदर रोड इथून केली, तिथून मग भाईंदर पाडा, मग कासारवडवली नाका, त्यानंतर आनंदनगर नाका. यानंतर थेट मुंबई-नाशिक हायवेवरील कळवा रेतीबंदर ब्रिजवरील खड्डे, तिथुन पुढे तीन हात नाका इथे शेवट केला आहे. सर्वच ठिकाणी रस्त्यावरील डांबर वाहुन गेल्याचे सामोरे आलं आहे.