पुणे : इरेला पेटलेले पुणेकर काय करतील याचा नेम नाही. रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगची कारवाई करत उचलल्याच्या रागातून एका पुणेकराने चक्क त्या दुचाकीच स्मारक उभारलंय, तेही रस्त्याच्या कडेला. सचिन धनकुडे असं या पुणेकरचं नाव असून त्यांनी कोथरूडमध्ये उभारलेल हे दुचाकीचं स्मारक सध्या चर्चेचा विषय बनलंय.


काही दिवसांपूर्वी सचिन धनकुडेंनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून काम करण्यासाठी निघून गेले. काही वेळाने ते जेव्हा परत आले तेव्हा गाडी जागेवर नव्हती. वाहतूक पोलीस गाडी चौकीला घेऊन गेल्याचं समजल्यावर ते चौकीत गेले आणि वादाला सुरुवात झाली. आपली गाडी नो पार्किंगमध्ये नव्हतीच असा त्यांचा दावा होता. पोलीस मात्र मानायला तयार नव्हते. मग मात्र धनकुडेनमधला पुणेकर जागा झाला आणि त्यांनी कोथरूडमधील पौड रस्त्यावर भर चौकात आपल्या गाडीचं स्मारक करायचं ठरवलं. 


यासाठी त्यांनी मजूर आणि कारागीर बोलावले आणि 15 फूट उंचीचं स्मारक तयार केलं. एवढंच नाही तर या स्मारकावर त्यांनी आणखी एक दुचाकी क्रेनच्या साहाय्याने नेऊन ठेवलीय. शिवाय या स्मारकाला तोरण आणि पाना - फुलांनी त्यांनी सजवल्याने येणारे - जाणारे थांबून या स्मारकाकडे पाहत आहेत. स्मारकाच्या चारही बाजूला त्यांनी पुणेरी पाट्या लावल्या आहेत. 




पुण्यात पार्किंगची समस्या किती गंभीर आहे आणि त्यामुळं सामान्यांना किती त्रास होतो हे या पाट्यांवर पुणेरी शैलीत मांडण्यात आलंय. पोलिसांच्या या कारवाईच्या निमित्ताने पुण्यातील पार्कींगच्या प्रश्नाला वाचा फुटावी असा आपला प्रयत्न असल्याचं धनकुडेचं म्हणणं आहे. आपण उभारलेलं हे स्मारक पोलिसांच्या विरोधात नसून पुण्यात वाहतुकीचा प्रश्न किती गंभीतर बनलाय आणि त्यावर उपाययोजना करणे किती गरजेचे आहे हे समजण्यासाठी आपण हे स्मारक उभारल्याचं धनकुडेचं म्हणणं आहे. 


पुणे देशातील सर्वाधिक दुचाकी असलेलं शहर आहे. चारचाकींची संख्याही पुण्यात मोठी आहे. विशेष म्हणजे पुण्याच्या लोकसंख्येपेक्षा पुण्यात नोंद झालेल्या वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनं रस्त्यावर येत असल्यानं वाहतूक कोंडी बरोबर पार्किंगची समस्या  देखील गंभीर बनलीय. हा गंभीर प्रश्न सोडवण्याऐवजी सामान्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो. 


मागील वर्षभरात वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना वेगवेगळ्या कारणांसाठी तब्ब्ल 92 कोटी रुपये दंड  ठोठावलाय. यावरून वाहतूक पोलीस किती मोठ्या प्रमाणत पुणेकरांकडून दंडाच्या स्वरूपात पैसे वसूल करत असल्याचं लक्षात येतंय. त्यामुळे एकीकडे पार्किंगला जागा नाही आणि दुसरीकडे पोलिसांच्या कारवाईचा बडगा आशा दुहेरी कात्रीत पुणेकर सापडले आहेत. 


आपण तयार केलेल्या दुचाकीच्या स्मारकामुळे पुण्यातील ही ज्वलंत समस्या समोर मांडली जावी असा आपला प्रयत्न असल्याचं सचिन धनकुडेचं म्हणणं आहे. सचिन धनकुडेंनी या स्मारकाच्या आतमध्ये गणेशोत्सव सुरु असल्याने गणपतीचीही प्रतिष्ठापना केली. संध्याकाळी एका क्रेनच्या साहाय्याने या स्मारकाच्या वर असलेली दुचाकी खाली काढून पुन्हा वरती ठेवण्याची कसरत ते करतात. या गणेशोत्सवातील हा हलता देखावा असल्याचा त्यांचा दावा आहे.