पुण्यात वाहतूक पोलीस हेल्मेटसक्ती आणि वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करताना दिसत आहेत. जानेवारीमध्ये लागू केलेल्या हेल्मेटसक्तीला सर्वपक्षीय पुणेकरांनी विरोध केला होता. मोठी आंदोलने झाली, मोर्चेही काढण्यात आले. मात्र तरीही पुणे पोलीस हेल्मेट सक्तीवर ठाम राहिले आणि फक्त पाच महिन्यात तब्बल 19 कोटींचा दंड वसूल करण्यात आला. फक्त हेल्मेट परिधान न केल्यामुळे तब्बल 3 लाख 92 हजार 546 दुचाकीचालकांकडून हा दंड वसूल करण्यात आला आहे.
दररोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या पुणेकरांमध्ये पोलिसांच्या या कारवाईमुळे सध्या नाराजी पसरली आहे. ड्रेनेजचे खड्डे, अरुंद आणि खराब रस्ते, चुकीचे गतीरोधक असलेले रस्ते हे सगळे दिव्य रोजच सहन करणारे सामान्य नागरिक या हेल्मेटसक्तीला चांगलेच वैतागले आहेत.
महापौरांची भूमिका काय?
पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना पुणेकरांवर लादलेल्या हेल्मेटसक्तीविषयी विचारणा करण्यात आली. हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा विरोध नाही, तर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून एकदम सर्वच दंड वसूल केला जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, असं महापौरांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं. दंडाच्या पावत्या नागरिकांना वेळच्या वेळी मिळाल्या तर नागरिकांमध्ये उद्रेक निर्माण होणार नाही, त्यामुळे याविषयी पोलीस आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचंही महापौर म्हणाल्या.