पिंपरी : लोकसभा निवडणुकीतील दारुण  पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात आले आणि मुस्लिम बांधवांसोबत रोजा इफ्तार केला. मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याच्या आणि दोन दिवसानंतर साजऱ्या होणाऱ्या ईदच्या शुभेच्छाही पार्थनी दिल्या.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पार्थ पवार काहीसे अलिप्त झाल्याच्या चर्चा होत्या. या इफ्तार पार्टीला पार्थ येतील का? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र त्यांनी इफ्तारला हजेरी लावत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला.



मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा तब्बल दोन लाख मतांनी दारुण पराभव केला होता. तेव्हा त्यांनी पीआर मार्फत प्रतिक्रिया दिली होती. पण जिव्हारी लागलेल्या पराभवामुळे ते जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते.

पवार कुटुंबियातील हा पहिला पराभव पचवणं तसं कठीणच होतं, मात्र त्यातून सावरत पार्थ पवार आता जाहीर कार्यक्रमात हजर झाले आहेत. प्रसार माध्यमांपासून चार हात लांब राहणाऱ्या पार्थने यावेळी ही प्रतिक्रिया देणं टाळलंच. पण यानिमित्ताने ते पुढच्या निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं बोललं जातं आहे.