पुणे :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दोन गटांमध्ये (Savitribai Phule Pune University) झालेल्या गोंधळामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यात आता विद्यापीठ परिसरात प्रवेशावर बंधनं घालण्यात आली आहे. दरम्यान याच गोंधळावर खासदार सुप्रिया सुळे यांनी कडक शब्दांत ट्विट केलं आहे. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले, असं प्रश्न उपस्थित केला आहे.  दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 


त्यासोबतच ज्या कोणत्या अधिकाऱ्याने मुलांना मारहाण केली याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. 


ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय?


सुप्रिया सुळे यांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भाजपाप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. पुणे हे 'विद्येचे माहेरघर' म्हणून ओळखले जाते. या शहरात कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणं सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही.  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधिकाराने मुलांना मारहाण केली याची कसून चौकशी होण्याची गरज आहे.गृहमंत्र्यांचे या गुंडगिरीला अभय आहे का?याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा. विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी.


दोन्ही गटाच्या माहिला कार्यकर्त्या भिडल्या...


विद्यापीठात झालेल्या कालच्या गोंधळात भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या आणि एसएफआयची एक कार्यकर्ती यांच्यात चांगलाच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. एसएफआयची एका कार्यकर्तीने भाजप युवा मोर्चाच्या कार्याकर्त्यांवर गोंधळादरम्यान अंगावर आल्याचा आरोप केला. गर्दीत महिलांना हात लावता लाजा वाटत नाही का?, अशा शब्दात एफआयची एक कार्यकर्तीने भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांना सुनावलं. हे पाहून भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या होत्या. महिलांनी धक्काबुक्कीदेखील केली होती. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करुन हा गोंधळ थांबवला होता. 






इतर महत्वाची बातमी-


Pune News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएम मोदींविरोधात आक्षेपार्ह लिखाण, दोन गटांमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले...