पुणे : पुण्यात (Pune) भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ काही संपायचं नाव घेत (Dogs) नाही आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्येदेखील वाढ होत आहे. त्यातच पुन्हा एकदा भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. हांडेवाडी (Handewadi) येथील कुमार पेबल पार्क हाऊसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या कुत्र्यांमुळे सोसायटीमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आलं आहे.
या हल्ल्यानंतर महापालिकेचं श्वान पथक दाखल झालं मात्र त्याच सोसायटीतील एका प्राणीप्रेमी महिलेने कुत्र्यांना महापालिकेकडे सोपवण्यास नकार दिला आहे. मात्र याच कुत्र्यांच्या हल्ल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागल आहे. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांनी महिलेवर संताप व्यक्त केला आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे सोसायटीच्या आवारात मुलांना खेळता येत नाही शिवाय वयस्कर नागरिकांनादेखील या भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्याचा नाहक बळी जाण्यापूर्वी कुत्र्याचा योग्य बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. श्वानफिडर आणि भटक्या कुत्र्यांची संख्या या दोन्हींवर तातडीने आणि निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी महापालिकेला केली असून, रहिवाशांना होणारा धोका लक्षात घेता त्यांनी पालिकेला विनंती केली आहे.
भटक्या कुत्र्यांकडून धोकाच जास्त
रस्त्यांवर असलेली भटकी कुत्रे कोणत्याही व्यक्तीवर हल्ला करतात. वेगाने जाणाऱ्या वाहनांचा पाठलाग करुन हल्ला करतात. यामुळे अपघात होण्याचा घटनाही घडल्या आहेत. पुणे मनपाकडून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्जंतुकीकरण केले जाते. त्यामुळे भटकी कुत्री कमी होत असली तरी त्यांचे हल्ले वाढत असल्याचे चित्र दुसऱ्या बाजूला दिसत आहे. यामुळे पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ
पुण्यातच नाही तर राज्यात कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ झाली आहे. वाघ बकरी चहा (Wagh Bakri Tea) समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे कुत्र्याने हल्ला केल्याने जखमी होऊन निधन झालं होतं. त्यानंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी पुणे महापालिकेने कुत्र्यांच्या हल्ल्याची आकडेवारी जाहीर केली होती. ही आकडेवारी धक्कादायक होती. ही आकडेवारी बघितली तर मागील नऊ महिन्यांत तब्बल 16 हजार 372 जणांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. मागील वर्षभरात भटक्या कुत्र्यांनी 16 हजार 569 जणांना चावे घेतले होते. त्या तुलनेत आता नऊ महिन्यांत चावा घेणाऱ्या कुत्र्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. अनेक प्रकरणांची नोंद मनपाकडे झालेली नाही. त्यामुळे आकडेवारीपेक्षाही जास्त हल्ले झाल्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी-