Pune Rain Eknath Shinde Updates: पुण्यात मुसळधार पावसामुळे (Pune Heavy Rain)अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना नागरिकांना आवाहन केलं आहे.


सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी, लोकांनी घाबरण्याचे कारण नाही. सर्व अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुण्याचे जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त, एनडीआरएफ आणि लष्कराचे कर्नल यांच्याशी मी बोललो आहे. तसेच याआधीच त्यांनी एनडीआरफच्या बोटी वैगरे रवाना केल्या आहेत. लष्कर देखील आता पुण्यात पोहचते आहे. तसेच वेळ पडल्यास बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले. 


खाण्या-पिण्याची व्यवस्था करा, जिल्हाधिकाऱ्यांना आदेश


खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्गाचा जोर आणखी वाढणार आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनला सतर्कतेचा आदेश दिले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी देखील बोललो आहे. मी स्वत: या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. लोकांची खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, अशी माहिती देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. 


पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही- सुप्रिया सुळे


पुण्यात ज्या प्रकारची कामं झालीत, त्यामुळे पाणी जाण्यासाठी जागाच ठेवलेली नाही. खासदार मुरलीधर मोहळ म्हणाले की, नद्यांच्या पात्रांजवळ जास्त पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते, मेट्रोची काम झालीत, यावेळी नाल्याचं प्लॅनिंगच नाही झालं मी नेहमी सांगत आलीय, विकास कामाच्याबाबतीत हलगर्जीपणा नको. गेले अनेक वर्षे प्रशासनाकडून इन्फ्रास्ट्रक्चरची काम झालेली आहे, त्यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडला जातोय, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना केली. 


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा-


आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं आज या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट दिला आहे.


व्हिडीओ-