पुणे: पुणे शहरात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. खडकवासला धरणातून 40000 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे संसार पाण्यावर तरंगताना दिसत आहे. तर सिंहगड रोडवरील एका सोसायटीत छातीपर्यंत पाणी साठल्याने (Pune Water Logging) इमारतीमधील नागरिकांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू बोटी मागवण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. 


अजित पवार यांनी काहीवेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून  पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला. पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरल्याने तात्काळ उपायोजना करण्यासंदर्भात आदेश अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. अजित पवार साडेनऊ वाजता मंत्रालयात पोहोचणार आहेत. खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहुन नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. धरणातून सोडण्यात आलेले पाणी आणि सतत सुरु असलेला पाऊस यामुळे पुण्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे.


पुण्यातील  पर्यटनस्थळांवर बंदी


जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी संबंधित उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच मदत व बचाव पथकांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महानगरपालिका प्रशासनाने नदीकाठच्या भागात आवश्यक दक्षतेचे उपाय करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पुढील 48 तासात धोकादायक पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी करावी, धोकादायक ओढे, नाले, पुलावरील वाहतूक बंद ठेवावी असे निर्देशही डॉ.दिवसे यांनी दिले आहेत.


आणखी वाचा


Heavy Rain in Pune: पवना धरणक्षेत्रात रेकॉर्डब्रेक पाऊस, एका रात्रीत पाणीसाठा 10 टक्क्यांनी वाढला


Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग, शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर