पुणे: पुणे जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस (Pune Rain) सुरु आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मोठ्याप्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असून पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमध्येही पावसाचा प्रचंड जोर आहे. पिंपरी चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरण (Pawna Dam) परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या बारा तासांत तब्बल 374 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने अशी तुफान बॅटिंग केल्यानं धरणाच्या पाणीसाठ्यात अवघ्या 12 तासांमध्ये थेट 10 टक्के वाढ झाली आहे. काल सायंकाळी 5 वाजता धरणाचा पाणी साठा 57.70 टक्के इतका होता, तो आता 67.80 टक्के झालाय. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.


लोणावळ्यात 4 तासांत 370 मिमी पावसाची नोंद; पर्यटकांसाठी धोक्याचा इशारा


पर्यटननगरी लोणावळ्यात ही रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे. गेल्या चोवीस तासांत इथं 370 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. पावसाचा वाढता जोर पाहता, पर्यटनस्थळी पर्यटकांनी न येण्याचं, आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. गेली दोन दिवस ढगफुटी सदृश्य पाऊस बरसत आहे. काल सुद्धा तब्बल 274 मिलीमीटर पाऊस कोसळला होता. आज ही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांनी येऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे.


ताम्हिणी घाटात दरड कोसळली


मुसळधार पावसामुळे मुळशी येथील ताम्हिणी घाटात दर कोसळली आहे. त्यामुळे पुणे - कोलाड महामार्ग बंद झाला आहे. पोलिस अधिकारी स्टाफ , तहसीलदार साहेब , प्रांत अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरु आहे.


खेड शिरुरमध्ये मुसळधार पाऊस


उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. जोरदार पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील  शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या भागातील नद्या ,ओढे ,नाले तुडुंब भरून वाहत आहेत.


वीर धरण 85 टक्के भरले, नीरा नदीत आज होणार विसर्ग


नीरा नदीवर असलेले वीर धरण 85 टक्के भरले आहे. त्यामुळे वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस असल्याने नीरा नदीपात्राशेजारील गावातील नागरिकांनी दक्षता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. वीर धरणातून नीरा नदीत आज एक हजार क्युसेकने पाणी सोडणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


VIDEO:  पवना धरणात एका रात्रीत पाण्याचा साठा 10 टक्क्यांनी वाढला



आणखी वाचा


पुणेकरांनो सावधान! आज जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडा, प्रशासनाचं आवाहन