पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. भर  (Pune News)उन्हाळ्यात पुणेकरांची (Pune Water Cut) पाणीकपात टळली आहे. कालवा समितीच्या बैठकीत  पुण्यात पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज कालवा समितीची बैठक घेतली. या बैठकीत धरण साखळीतील पाणी साठ्याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पाणीकपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


मागील काही महिन्यांपासून पुणेकरांवरची पाणी कपातीची टांगती तलवार होती. पाणीकपात होणार आणि भर उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरं जावं लागणार असल्याचं चित्र होतं. पंचवीस वर्षातील सर्वात कमी पाऊस यावेळी पुणे जिल्ह्यात धरण क्षेत्रात झाला होता मात्र तरीही यावेळी पुणेकरांना पाणी कपातील सामोरे जावे लागणार नाही. त्यासोबतच पुणे जिल्ह्यात शेतीलाही पाणी मिळणार आहे. शेतीसाठी उन्हाळ्यात दोन आवर्तन सोडली जाणार आहे. पहिलं आवर्तन 3 मार्चपासून सुरू होणार आहे. शेतीसाठी 7 टीएमसी पाणी सोडणार असल्याने शेतकऱ्यांनादेखील दिलासा मिळाला आहे. 


पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा होतो. गेल्या वर्षी आजच्या तारखेला धरणांमध्ये 19.28 टीएमसी पाणीसाठा होता. यावर्षी तो 16.28 टीएमसी म्हणजे तब्बल तीन टीएमसी कमी आहे. अशा परिस्थितीत शहराला पुढील किमान पाच महिने पुरेल अशा पद्धतीने पाण्याचे नियोजन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र ती तूर्तास टळली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे असं असलं तरी पुढच्या बैठकीत याबाबत पुन्हा विचार विनिमय होऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, पालकमंत्री  म्हणाले आहेत.


सध्या धरणांमध्ये 16 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात खडकवासला धरणात 1.12 टीएमसी, पानशेत धरणात 7.14 टीएमसी, वरसगाव धरणात 7.62 टीएमसी आणि टेमघर धरणात 0.04 असा एकूण 16 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. दरवर्षी उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढते. त्यात यावर्षी पाऊस प्रचंड कमी प्रमाणात झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यापूर्वीच पाणीकपात करण्याची वेळ येण्याची शक्यता होती. महापालिकेनेदेखील पाणी प्रश्नासंदर्भात ठोस उपाययोजना केल्या आहेत. मात्र यंदाची पाणीकपात टळली आहे. मात्र येत्या काही दिवसांत यावर पुन्हा एकदा निर्णय घेतला जाणार आहे.