पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी येरवाडा पोलीस आणि ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याची माहिती आता समोर येत आहे. 19 मे म्हणजे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यावेळी या धनिकपुत्राला स्थानिक नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर या मुलाला येरवाडा पोलीस (Pune Police) ठाण्यात आणण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर त्याच्या शरीरातील मद्याचे प्रमाण तपासण्यासाठी त्याची तातडीने ब्लड टेस्ट (Blood Test) होणे आवश्यक होते. मात्र, येरवाडा पोलिसांनी या धनिकपुत्राला अपघातानंतर (Pune Car Accident) तब्बल 18 तासांनी म्हणजे साधारण सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयात ब्लड टेस्टसाठी नेले. 


एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपीने मद्यप्राशन केल्याचा संशय असल्यास पहिल्या दीड तासात त्याच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. जेणेकरुन त्याने मद्यप्राशन केले असल्यास ब्लड रिपोर्टमध्ये त्याची अचूक माहिती कळते आणि न्यायालयात हा महत्त्वाचा पुरावा ठरु शकतो. मद्यसेवन केल्यानंतर शरीरात 24 तास मद्याचे अंश राहतात. पण जितका वेळ जाईल तितक्या प्रमाणात शरीरातील मद्याचा अंश कमी होतो. परिणामी पुण्यातील धनिकपुत्राला वाचवण्यासाठीच येरवाडा पोलिसांनी त्याला जाणुनबुजून ससून रुग्णालयात उशीरा नेले का, या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे.


येरवाडा पोलीस ठाण्यात धनिकपुत्राला पिझ्झा-बर्गर खायला का दिला?


येरवाडा पोलीस ठाण्यात पुणे अपाघातामधील मुख्य आरोपी असलेल्या विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. यावरुन बराच वादंग झाला होता. त्यानंतर येरवाडा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांनी धनिकपुत्राला पोलीस ठाण्यात पिझ्झा-बर्गर खायला दिल्याचा आरोप झाला होता. अग्रवाल कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलीस ठाण्यात नेले, अशी चर्चा आहे. पोलिसांनी धनिकपुत्राला दिलेल्या या रॉयल ट्रिटमेंटची बरीच चर्चा झाली होती. मात्र, आता यामागे वेगळेच कारण असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. 


मद्यप्राशन केल्यानंतर एखाद्याने पाव, चीज सेवन केल्यास किंवा नैसर्गिक विधी केल्यास शरीरातील मद्यांशाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळेच अल्पवयीन मुलाला त्याच्या कुटुंबीयांनी येरवडा पोलीस ठाण्यात पिझ्झा खाण्यास दिला असावा. जेणेकरुन ब्लड रिपोर्टमध्ये त्याच्या रक्तातील मद्यांश कमी दिसेल, असा प्रयत्न असावा. मात्र, अग्रवाल कुटुंबीयांना हे सगळे करण्यासाठी इतकी सगळी साद्यंत माहिती कोणी पुरवली, याविषयी अनेकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे.


आणखी वाचा


बालसुधारगृहात धनिकपुत्राचे पिझ्झा-बर्गरचे चोचले बंद, घरचं जेवणही नाही; नाश्त्याला पोहे, जेवणात पोळी-भाजी