पुणे : पुण्यातील हिट अँड रन अपघात (Pune Hit And Run Case) प्रकरणी बाल आरोपीला मदत करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलविणाऱ्या डॉक्टरांविरोधात आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (Maharashtra Medical Council) कारवाई सुरू केली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर या दोघांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस बजावत सात दिवसांच्या आत लेखी उत्तर मागितलं आहे. डॉ. तावरे आणि डॉ. हळणोर यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.
डॉ. तावरे आणि डॉ. हळणोरच्या अडचणी वाढल्या
डॉ. तावरे आणि डॉ. हळणोर दोन्ही डॉक्टरांची कृती डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारी आणि वैद्यकीय व्यवसायाच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे मत महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे विद्यमान प्रशासक डॉ. विंकी रुघवानी यांनी व्यक्त केलं आहे. ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टर्सनी बाल आरोपीच्या रक्ताच्या नमुन्या संदर्भात जी कृती केली आहे. त्या संदर्भात दोन्ही डॉक्टर्सचे स्पष्टीकरण तसेच पुरावे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल तपासणार असून त्यानंतर पुढे दोन्ही डॉक्टरांविरोधात कारवाई केली जाईल, असेही डॉक्टर रुघवानी म्हणाले.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडून कारवाईला सुरुवात
प्रसार माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या त्याच्या आधारावर स्वतःहून महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने या प्रकरणात कारवाई सुरू केली असल्याची माहिती डॉ. रुघवानी यांनी दिली आहे. दरम्यान, एखाद्या डॉक्टरची कृती वैद्यकीय व्यवसायाच्या तत्त्वांच्या विरोधात असेल तर, अशा डॉक्टरचा लायसन्स एक दिवसांपासून काही वर्षांपर्यंत निलंबित करण्याचा अधिकार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलला आहे, अशी माहिती यावेळी डॉ. रूघवानी यांनी दिली आहे.
तिघांना 30 मे पर्यंत पोलिस कोठडी
दरम्यान, डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर यांना सोमवारी कोर्टात हजर करण्याता आलं. यानंतर न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. ससून रुग्णालयातील शिपाई घटकांबळे हा तावरेंसाठी दलाल म्हणून काम करत होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे. डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळणोर आणि शिपाई अतुल घटकांबळे या तिघांना न्यायालयाने 30 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पुणे ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणात ससून रुग्णालयातील शिपाई अतुल घटकांबळे डॉ. अजय तावरे यांच्यासाठी दलाल म्हणून काम करत होता. डॉ. अजय तावरे यांच्यासाठी पैशांची देवाण-घेवाण करण्याची जबाबदारी घटकांबळेवर होती. घटकांबळेला पैसे देणारा व्यक्ती कोण, याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे, घटकांबलेला मिळालेल्या पैशातून त्याने डॉ. हळणोर यांना 2.5 लाख रुपये दिले. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून घटकांबळेला मिळालेले पैसे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असूम त्याच्याकडून 50 हजार रुपये जप्त करण्याता आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :