पुणे : पुण्यातील कल्याणी नगर अपघातात मोठमोठे (Pune Porsche Car Accident) खुलासे होताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला चांगलाच वेग आला आहे. विशाल अग्रवाल यांच्या घरावर छापेमारी केल्यानंतर आता 
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तब्बल 100 पेक्षा अधिक सी सी टिव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजमधून मोठी माहिती हाती येण्याची आणि अग्रवाल कुटुंबियांची कुंडली बाहेर येण्याची शक्यता आहे. 


विशाल अग्रवाल यांचे निवस्थान, कोझी पब, ब्लॅक हॉटेल तसचं अपघात स्थळ अशा सगळ्या ठिकाणचे फुटेज पोलिसांनी गोळा केले आहे.  त्यासोबतच त्या रात्री गाडी ज्या परिसरात फिरली. त्या प्रत्येक परिसराचं सीसीटीव्ही पोलिसांनी मागवलं आहे. या सगळ्याची पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडून पडताळणी करण्यात येणार आहे. हा सगळा तपास अत्यंत कडक स्वरुपाचा करण्यात येणार आहे. यातून सगळ्या प्रकरणाची क्रोनोलॉजीची माहिती मिळणार आहे आणि गुन्हे शाळेच्या हाती अनेक धागेदोरे लागण्याची शक्यता आहे. 


नातवामुळे आजोबांना जेलवारी 


पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अगरवाल याला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चालकाला डांबून ठेवणं, दबाव टाकणे, जीवे मारण्याची धमकी या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तसेच सीसीटीव्हीशी छेडछाड केल्याचा आरोपही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.  आता पुणे सत्र न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.जेव्हा अपघात घडला त्यावेळी सुरेंद्र अगरवाल याने त्याच्या नातवाला वाचवण्याचा प्रयत्न केला. गाडी तू चालवत असल्याचं पोलिसांना सांग असं त्याने ड्रायव्हर गंगाराम पुजारी याला सांगितलं. तसेच सुरेंद्र अगरवाल याने ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोपही  त्याच्यावर आहे.


लेकाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण... 


विशाल अग्रवाल आणि त्यांचे वडिल सुरेंद्र अग्रवाल या दोघांनीही या प्रकरणात लेकाला वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनादेखील मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. अगदी ड्रायव्हरलादेखील डांबून ठेवत त्याला खोटा जबाब नोंदवला आणि वडिलांसोबत आजोबादेखील गोत्यात आले. त्यानंतर आजोबांनादेखील अटक करण्यात आली कोर्टात हजर केल्यानंतर 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Accident : बापानंतर आता आजोबाचा नंबर; ड्रायव्हरला डांबून ठेवणे, जीवे मारण्याची धमकी प्रकरणी सुरेंद्र अगरवालला 28 मे पर्यंत पोलिस कोठडी