Pune porsche car accident पुणे: पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपी असणाऱ्या धनिकपुत्राला वाचवण्यासाठी  शासकीय यंत्रणांमधील काही अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रकारे काम करत होते, याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांच्या मुलाने कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारने दोघांना चिरडले (Pune porsche car accident) होते. यावेळी या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते. मात्र, त्याच्या अल्कोहोल टेस्टचा रिपोर्ट नेगेटिव्ह यावा, यासाठी ससूनमधील दोन वरिष्ठ डॉक्टरांनी या धनिकपुत्राचे रक्ताचे नमुनेच बदलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा अहवाल बदलल्याप्रकरणी डॉ. अजय तावरे याला अटक करण्यात आली आहे. 


धनिकपुत्राला वाचवण्यासाठी सुरुतीपासूनच फिल्डिग लावण्यात आली होती. त्यामुळे काहीतरी गडबड होण्याचा अंदाज पोलिसांना होता. ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाकडून धनिकपुत्राच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यामध्ये रक्ताच्या परीक्षणात मुलाच्या शरीरात मद्य आढळून आले नाही. यावर पोलिसांना शंका आली. त्यानंतर पोलिसांनी ससूनकडे मोर्चा वळवला आणि पुढील तपासाला सुरुवात केली. पोलिसांकडे दोन स्क्त चाचणीचे अहवाल होते. मुलाच्या रक्त चाचणीचा अहवाल कोणता हे शोधायचे असेल, तर पोलिसांना त्याच्या वडिलांची डीएनए चाचणी करणे आवश्यक होते. त्यानुसार पोलिसांनी वडिलांची डीएनए चाचणी केली. त्यानंतर ससून रुग्णालयातील रक्त नमुना आणि औंध रुग्णालयात देण्यात आलेला रक्त नमुना या तिन्हींचे एकाचवेळी परीक्षण करण्यात आले असता, ससूनमधील रक्ताच्या नमुन्याशी वडिलांचे रक्त जुळले नाही. मात्र, औंधमधील रक्त्ताच्या नमुन्यासोबत रक्त जुळले. त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा ससून रुग्णालयाकडे वळवला अन् यासर्व प्रकरणाचं बिंग फुटल्याचं समोर आलं आहे. 


दोन्ही डॉक्टरांना राहत्या घरातून अटक


औंधमधल्या सरकारी रुग्णालयात वडिलांचेही रक्ताचे नमुने पाठवण्यात आले. औंधमध्ये झालेल्या तपासणीत दुसऱ्यांदा घेतलेले रक्त आणि वडिलाचे डीएनए जुळल्याच समोर आलं मात्र पहिले रक्ताचे दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचेही समोर आले. पोलिसांनी पाहिले रक्ताचे नमुने घेणाऱ्या डॉ श्रीहरी हळणोरला अटक केली. श्रीहरी हळनोरने पोलिसांच्या चौकशीत अजय तावरे यांच्या सांगण्यावरून रक्ताचे नमुने बदलले असल्याचे सांगितलंय. पुणे पोलिसांनी अखेर रात्री उशिरा दोघांना राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.


तीन लाख रुपयांच्या बदल्यात फेरफार


दोन्ही डॉक्टर आपले कृत्य लपवत होते. यावेळी हळनोरला पोलिसी खाक्या दाखवत त्याला बोलते केले. यावेळी त्याने बाळाच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याची कबुली दिली. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये मिळाल्याचेही त्याने पोलिसांनी सांगितले. मात्र, तावरे याने किती पैसे घेतले हे समजले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तर, शिपाई अमित घटकांबळे मार्फत पैशाचा व्यवहार झाला असल्यामुळे त्यालादेखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलिसांनी ससूनमधील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी करण्यात येत आहे.



हे ही वाचा :


Pune Accident : धनिकपुत्राचे रक्ताचे नमुने फेकून दिले, दुसऱ्याच तरुणाचे ब्लड सॅम्पल घेऊन रिपोर्ट बदलला, ससूनच्या डॉक्टरांचा पर्दाफाश