Chitra Wagh : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांची पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांकडे याबाबतची सूचना केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. चित्रा वाघ या संबंधित गुन्ह्याबाबत खोटी माहिती देऊन बदनामी करत असल्याची तक्रार कुचिक यांच्या मुलीने केली आहे. 


शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक हे सध्या जामीनावर असून गुन्ह्याचा तपास सुरू आहे. तरी सुद्धा चित्रा वाघ या गुन्ह्याविषयी असबंध आणि खोटी माहिती माध्यमांना देत असून अपमानजनक टीका करत आहेत. त्यामुळे कुटुंबाची समाजात बदनामी होत असल्याचे कुचिक यांच्या मुलीने म्हटले. 


या प्रकरणातील फिर्यादी आणि चित्रा वाघ या जाणीवपूर्वक आणि संगनमताने या प्रकरणाची मीडिया ट्रायल चालवीत आहेत. त्यामुळे या दोघींमधील संगनमताची चौकशी व्हावी आणि त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने दाखल केलेल्या तक्रारीत केली आहे. प्रसार माध्यमावरून सुरू असलेले खोटे आणि अपमानजनक आरोप करू नये यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढावेत अशी मागणी केली आहे. याच तक्रारीवरून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना तपास करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा 


शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. त्यानुसार पोलिसांनी कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.