पुणे : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पुण्यातील येरवडा इथल्या बालसुधारगृहातील मुलांबरोबर 'झुंड' हा चित्रपट पाहिला. 'झुंड'च्या च्या संपूर्ण टीमला घेऊन नागराज मंजुळे काल (20 मार्च) स्वतः पुण्यातील येरवडा इथे असलेल्या बालसुधार कारागृहात पोहोचले. चित्रपट पाहिल्यानंतर नागराज मंजुळे यांनी या मुलांसोबत संवाद देखील साधला. त्याचबरोबर बालसुधारगृहात असलेल्या मुलांना अनेक गोष्टी देखील समजावून सांगितल्या. त्यांचं संपूर्ण बोलणं ऐकून या मुलांनीही आयुष्यात आम्ही काहीतरी करुन दाखवू असं, आश्वासन नागराज मंजुळे यांना दिलं.


नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या चित्रपटाची चर्चा सध्या संपूर्ण देशभर होत आहे. मुळातच दिग्दर्शक नागराज मंजुळे हे आपल्या कॅमेरामधून वास्तव टिपण्याचा आणि प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. झोपडपट्टीतल्या मुलांना घेऊन नागराज मंजुळे यांनी झुंड चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील आणखी एक वास्तव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


Jhund Movie Review : ‘झुंड’...भिंतीपलिकडच्या माणसांची अस्वस्थ करणारी गोष्ट!


नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांची चर्चा होतच असते, सोबतच यातून त्यांच्या साधेपणाचीही प्रचिती येते. कारण हा चित्रपट प्रमोट करण्यापासून ते समाजातील विविध घटकांना दाखवण्यासाठी ते आग्रही होते. त्याचाच भाग म्हणून त्यांनी पुण्याच्या येरवड्यातील बालसुधारगृहामधील मुलांसोबत चित्रपट पाहिला आणि त्यांच्याशी संवाद साधला. हा चित्रपट बालसुधारगृहात देखील दाखवला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं मात्र आज काही तरी सार्थक झाल्याची भावना नागराज मंजुळे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली. 


नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड (Jhund) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कथानकाला आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


झुंड हा चित्रपट स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर आणि रिंकू राजगुर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाची निर्मिती टी सीरिजने केली आहे.