पुणे : सडकछाप गुंडांकडून सुरु असलेला उच्छाद तसेच टोळीयुद्धातून सुरु असलेल्या हत्याकांडाविरोधात पुणे पोलिसांनी (Pune Police) आता जागेवर करेक्ट कार्यक्रम करत कारवाई सुरु केली आहे. सडकछाप गुंडांना धडा शिकवण्यासाठी पुणे पोलिसांनी आज (15 जानेवारी) पुन्हा एकदा सराईत गुन्हेगारांची पुन्हा धिंड काढली. अभयसिंग सिकंदर सिंह जुनी आणि दीप दिलीप कसबे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन आरोपींनी दुकानांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पोलिसांनी ज्या ठिकाणी गाड्या फोडत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी धिंड काढत पुणे पोलिसांनी धडा शिकवला. हडपसर भागामध्ये दोघांनी दुकानांची तोडफोड केली होती. 


तलवारीने केक कापणाऱ्या तरुणांची पोलिसांनी काढली धिंड


दरम्यान, तीन दिवसांपूर्वी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका आरोपीचा बर्थडे पुण्यातील जनवाडी येथील तरुणांनी रस्ता अडवून आणि दुचाक्या उभ्या करुन साजरा केला होता. या प्रकरणी बर्थडे साजरा करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत धिंड काढली होती. मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेला एक आरोपी पुण्यातील येरवडा (Yerawada) तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्यांचा कथित भाई तरुंगात असताना परिसरात दहशत निर्माण करण्यात आली. येरवाडा तुरुंगाची आणि शिक्षा भोगत असलेल्या आरोपीची केकवर प्रतिकृती उभारण्यात आली होती. बर्थडे साजरा करताना तरुणांनी रस्त्याच्यामध्ये गाड्या उभ्या केल्या. तलवारीने केक कापण्यात आला. शिवाय ,बर्थडेसाठी गर्दी करुन रस्ताही बराच काळ अडवून ठेवला होता. पोलिसांना माहिती मिळताच तरुणांवर कारवाई करण्यात आली. 


शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर आतापर्यंत 24 आरोपींना अटक


दुसरीकडे, गँगस्टर शरद मोहोळच्या खून प्रकरणात सहभागी असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी (14 जानेवारी) मध्यरात्री गुंड विठ्ठल शेलारसह 11जणांना ताब्यात घेतलं आहे. पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच पोलिसांच्या अटकेत येणार असल्याचा दावा पोलिसांनी केली आहे. मागील दोन दिवसांपासून गुन्हे शाखेचे पोलीस या आरोपींच्या मागावर होते. मात्र ते पोलिसांना हुलकावणी देत होते. अखेर रविवारी मध्यरात्री पनवेल ते वाशी या दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यासाठी पुणे पोलिसांनी पनवेल पोलिसांची मदत घेतली. पुणे पोलिसांनी शरद मोहोळच्या हत्याकांडानंतर आतापर्यंत तब्बल 24 आरोपींना अटक केली आहे. पहिल्यांदा या प्रकरणात रविवारपर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली होती.


इतर महत्वाच्या बातम्या