Pcmc Crime : फटाका (crackers) लावून गाडीचा लाईट फोडल्यावरुन वाद झाला आणि याच वादातून एका सराईत गुन्हेगाराची (Pcmc Crime) हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरी एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. पवन विष्णु लष्करे असं या सराईत गुन्हेगाराचं नाव आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक आली आहे. या हत्येमुळे पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात खळबळ उडाली आहे.
पूर्ववैमस्यातील वादातून टोकाचं पाऊल
शहरात सगळीकडे दिवाळीचा सणाचा उत्साह होता. त्यात दोन दिवसांपूर्वी एकाने सोन्या जाधव यांच्या गाडीची लाईट सुतळी बॉम्ब लावून फोडली होती. त्यानंतर त्यांना मारहाण केली होती. याच वादातून सोन्या जाधव, अक्षय काळे आणि त्यांच्या आठ साथीदाराने मिळून कट रचला आणि पवन विष्णू लष्करेचा कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली. पूर्ववैमस्यातून बदला घेतल्याचा प्रकार घडल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. अक्षय काळे, हर्षल परशुराम जाधव, सोन्या परशुराम जाधव, गणेश शिंदे, साहिल मस्के, राजू दोडमाणे यांच्यासह इतर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लष्करे हा सराईत गुन्हेगार आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड हद्दीत पुन्हा गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं स्पष्ट झालं आहे.
पिंपरीत खूनाचं सत्र संपेना
पुण्याच्या (pune) बावधन परिसरात पूर्ववैमनस्यातून एका व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीतबसा कमलचंद जानी असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव होतं. याप्रकरणी प्रदीप बलभीम राजोळे, आकाश कांबळे, आकाश पवार यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रविवारच्या रात्री आठच्या सुमारास पीतबसा यांच्यावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्यांच्या डोक्यात, हातावर वार करण्यात आलेत. आरोपी फरार असून त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत होते. पीतबसा कमलचंद जानी यांचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होोता. पुण्यातील बावधन परिसरात या खूनामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या सगळ्यात जुने वाद टोकाला गेल्याने खून केल्याचं स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकाच महिन्यात दोन ते तीन हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पिंपरी परिसरात अनेक सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसवण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.