Trupti Desai : पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत तरीही या सर्वपक्षीय नेत्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. त्यावरुन त्यांनी टीका केली आहे. फेसबुकवर पोस्टवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी पुण्यातील सर्वपक्षीय नेते दिवाळी निमित्त वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येतात. वर्षभर सगळे नेते, आमदार एकमेकांवर टीका आणि राजकीय फटकेबाजी करत असतात, आरोप करत असतात. या सगळ्या मनभेद आणि मतभेदांना दूर ठेवून दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. गप्पा करतात एकमेकांना फराळ भरवतात.
यंदा दोन वर्षांनी दिवाळी निर्बंधमुक्त साजरी झाली. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. राजकीय नेत्यांच्या घरात देखील उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. शहराच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकमेकांवर फटकेबाजी करणाऱ्या पुण्यातील नेते आणि आमदारांनी वाडेश्वर कट्ट्यावर फराळाचा आस्वाद घेतला. आवडीच्या विषयांवर गप्पा देखील मारल्या. मात्र या सगळ्याचा तृप्ती देसाईंनी निषेध केला आहे. दरवर्षीच हा कट्टा घेण्यात येतो. मात्र माजी आमदारांना जाऊन 24 तास व्हायच्या आधीच तुम्ही एकत्र फराळासाठी भेटता. आमदार निम्हणांवर आलेली वेळ सगळ्यांवरच येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे.
फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?
'आज वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता, खरंतर हा कार्यक्रम पुढे ढकलता आला असता. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले, त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र परंतु एन्जॉय करताना दिसले. कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले त्याचा निषेधच आहे. आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्तीला पडलेला आहे', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.