Indapur Crime : जमिनीच्या वादातून (Crime) अंगावर ट्रॅक्टर घातल्याने चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी गावात जाधवपाटी येथे मंगळवारी (25 ऑक्टोबर) घडली आहे. अबुजर जब्बार शेख (वय 4 वर्षे 2 महिने) असं मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. जब्बार शेख यांनी इंदापूर पोलिसात जयप्रकाश नरहरी देवकाते यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. जब्बार शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जयप्रकाश नरहरी देवकाते यांनी जब्बार गफूर शेख यांचा मुलगा अबुजर जब्बार शेख याच्या अंगावर ट्रॅक्टर घातला आहे. त्यामुळे त्यांनी देवकाते यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 


ट्रक अंगावर घातल्याने अबुजर जब्बार शेख गंभीर जखमी झाला होता. अबुजर याला रुग्णालयात नेलं असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पूर्वीपासून दोघांमध्ये जमिनीवरुन वाद होते. त्यावरुन त्यांचे अनेकदा भांडण झाले होते. याच भांडणातून हा प्रकार घडल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. पूर्वीच्या जमिनीच्या व्यवहाराच्या भांडणावरुन जीवे मारण्याच्या उद्देशाने जयप्रकाश देवकाते याने मुलाच्या अंगावर, डोक्याला, तोंडाला, उजव्या कानाजवळ गंभीर आणि किरकोळ दुखापत करुन त्याच्या मृत्युस कारणीभूत ठरला. त्यानंतर ट्रॅक्टर त्याच्या मोकळ्या शेतात सोडून तिथून पळून गेला. घडलेल्या प्रकाराची पोलिसात तक्रार दिली आहे, त्यावरुन पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.


जमिनीच्या वादातून मुलाचा मृत्यू


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जब्बार शेख हे मजुरी करतात. त्यांनी दोन वर्षापूर्वी जयप्रकाश देवकाते यांच्याकडून 4 एकर जमीन नोटरी करार करुन विकत घेतली होती. 2021 मध्ये ते कुटुंबासह राहण्यास गेले होते. मात्र देवकाते यांनी शेख यांना जमीन परत देण्यासाठी वारंवार धमकी देत होते. यातूनच वाद टोकाला गेला. फिर्यादी हे मंगळवारी सकाळी घरातील खोलीमध्ये चहा पित बसले होते. अबुजर शेख हा त्यांचा 4 वर्षाचा मुलगा पडवीत चहा आणि बटर खात बसला होता. त्याच वेळी त्याला ट्रकची धडक लागली. यात शेख यांच्या घरातील पवडीचं नुकसान झालं आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान इंदापूर तालुक्यात जमिनीच्या वादातून होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे.