Pune Palkhi News : खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू झाले. त्यात आता आषाढी वारीदेखील तोंडावर आहे. त्यासाठी पुणे प्रशासनाकडून तयार सुरु करण्यात आली आहे. यातच उष्माघाताची काळजी घेण्याच्या सूचना पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. सोबतच यासंदर्भात स्वतंत्र यंत्रणादेखील तैनात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, शौचालय, वाहतूक व्यवस्था, रस्ते, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
उष्माघाताची काळजी घ्या...
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यंदा दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखी सोहळा होत आहे त्यामुळे सर्व विभागांनी संपूर्ण तयारी गतीने करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. यंदा भारतीय हवामानशास्त्र विभागाने अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पुणे, पिंपरी चिंचवड मनपा, नगरपरिषदा तसेच सर्व स्थानिक यंत्रणांनी पाणीपुरवठ्याबाबत दक्ष रहावे. पालखी जूनमध्ये निघणार असल्याने उष्णतेचा घटकही लक्षात घेणे गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
कामं तातडीने पूर्ण करा...
जिल्ह्यातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक सोहळा असून सर्वांच्या सहभागातून शांततेत, आनंदात आणि सौहार्दात हा सोहळा यशस्वी करू. भाविकांची कोणतीही अडचण होणार नाही यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी पालखी मार्ग, पालखी तळ, विसाव्यांची संयुक्त्त पाहणी केली आहे. पालखी सोहळा प्रमुखांसमवेत समन्वयाने काम सुरू आहे. पाहणी आणि बैठकीत निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागांनी आपापल्या विभागांकडील कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत, असंही ते म्हणाले.
पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत मागच्या वर्षीपेक्षा वाढ करण्यात येईल. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
पुरेसा बंदोबस्त असेल...
पालखीसाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येईल. पालखी सोहळ्याच्या मार्गावरील वाहतूक वळविण्याबाबत अगोदर पूर्वप्रसिद्धी करण्यात येईल. पालखी सोहळा व्यवस्थापकांनीही पुरेसे स्वयंसेवक नेमावेत, अशीही सूचना पुणे पोलिसांनी दिली आहे.