Pune DRDO Director Arrested : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या अर्थात डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. हनीट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला काही संवेदनशील माहिती दिल्याचा संशय  एटीएसला संशय आहे. एटीएसने त्यांच्यावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास आता पुणे पोलिस करत आहेत. डॉ. प्रदीप कुरुलकर असं अटक केलेल्या संचालकांचं नाव आहे.


डीआरडीओ ही संस्था देशाच्या लष्करासाठी लागणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हत्यारांची निर्मिती करते. या संस्थेच्या पुण्यातील संचालकांना अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या संचालकाने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करुन एटीएसने त्यांना अटक केली आहे. 


पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकांनी त्यांच्या कार्यालयामधून पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटीव्ह (PIO) चे हस्तक असलेल्या व्यक्तीसोबत ही संवेदनशील माहिती शेअर केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्हॉट्सअॅपद्वारे व्हाईस मेसेज, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संपर्कात राहिले असल्याची माहिती आहे. त्यानंतर दहशतवादी विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. 


डॉ. प्रदीप कुरुलकर हे नकळतपणे हनी ट्रॅपमधे अडकून पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांसोबत व्हिडीओ चॅट आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असल्याचे फेब्रुवारी महिन्यात भारतीय गुप्तचर संस्थांना लक्षात आले होते. त्यानंतर त्याची माहिती DRDO ला देण्यात आली. DRDO च्या व्हिजिलन्स विभागाने या प्रकरणाचा तपास केला आणि एक अहवाल तयार केला. या अहवालाच्या प्रती विविध भारतीय तपास यंत्रणांना देण्यात आल्या. त्यानंतर महाराष्ट्र ATS ने या प्रकरणाचा तपास केला आणि डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक केली. 


डॉ. प्रदीप कुरुलकर हे या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. नकळतपणे ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात आल्याच तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासात आढळून आलं आहे. डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी खरचं कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवलीय का याचा तपास केला जातोय.