लडाखमध्ये दरीत पडलेल्या पुण्याच्या पद्मेशवर चंदीगढमध्ये उपचार
एबीपी माझा वेब टीम | 18 Aug 2017 06:58 PM (IST)
अथक चढाईनंतर पद्मेश आणि त्याचे मित्र स्टोट क्रांगीच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र हवामान खराब झाल्यामुळं मित्रांनी पुढे न जाण्याचं ठरवलं. पद्मेशला मात्र शिखर खुणावत होतं.
पुणे : ट्रेकिंग करताना लडाखमधल्या स्टोक कांग्री शिखराजवळ कोसळलेल्या पुण्याच्या पद्मेश पाटीलची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर सध्या चंदीगढमधल्या लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लडाखच्या कुशीत 20 हजार फूट उंचीवर वसलेला आणि भल्या भल्या ट्रेकर्सना आव्हान देणारं स्टोक कांग्री शिखर. पुण्याचा पद्मेश पाटील आणि त्याच्या दोन मित्रांनीही स्टोक क्रांगी सर करायचं आवाहन स्वीकारलं. 9 ऑगस्टला प्रवास सुरु झाला. अथक चढाईनंतर पद्मेश आणि त्याचे मित्र स्टोट क्रांगीच्या पायथ्याशी पोहोचले. मात्र हवामान खराब झाल्यामुळं मित्रांनी पुढे न जाण्याचं ठरवलं. पद्मेशला मात्र शिखर खुणावत होतं. मित्रांना मागे सोडून त्यानं एकट्यानंच ट्रेकिंग करायचं ठरवलं. त्यानं जवळपास 18 हजार फुटापर्यंत यशस्वी चढाई केली. 15 ऑगस्टचा दिवस होता. स्टोक कांग्री पद्मेश पाटीलपासून फक्त 2 हजार फूट दूर होतं. मात्र ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पद्मेशच्या फुफ्फुसात पाणी जमा झालं. तशा अवस्थेत तो 1 हजार फूट खोलवर कोसळला.