Pune Nylon Manja News :  नायलॉनच्या मांजामुळे (nylon manja) दोन पोलीस  कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली आहे. पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर ही घटना घडली. यात दोन्ही पोलीस (police) जखमी झाले आहेत. एकाचा गळा, तर दुसऱ्याचा हात चिरला आहे. दोघेही दुचाकीवरुन प्रवास करत असताना ही घडना घडली आहे. 


महेश पवार आणि सुनिल गवळी अशी या दोन जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोन्ही पोलीस पुणे सातारा रस्त्यावरील शंकरमहाराज उड्डाणपुलावरुन निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन जात असताना मानेला मांजा अडकला आणि पवार यांच्या मानेला जखम झाली. त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेला सहकारी त्यांचा हात चिरला, अशी माहिती पक्षीप्रेमी बाळासाहेब ढमाले यांनी दिली. 


शहरात मागील काही दिवसांपासून अनेक पक्षी मांजाच्या फासेत अडकले आहेत. आतापर्यंत पुण्यातील पक्षीप्रेमी बाळासाहेब ढमाले यांनी किमान 20 पक्ष्यांना मांजाच्या विळख्यातून जीवनदान दिलं आहे. कसबा पेठेत मांजात अडकलेल्या तीन घारींची सुटका केली. ढमाले यांनी तीन घारींची मांजातून सुटका करुन कात्रज येथील प्राणी, पक्षांच्या अनाथालयात उपचारासाठी दाखल केले.


नायलॉन मांजा वापरून पतंग बराच काळ उडवता येतो, अशी समजूत असल्याने अनेक लोक पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर करतात. परंतु नागरिकांनी त्याचे दुष्परिणाम ओळखून नायलॉन मांजा बंद करणे आवश्यक आहे. त्यावर बंदी घातलेली आहेच. लोकांनी ते वापरु नये. तरच पक्षी, नागरिक जखमी होणार नाहीत, असं आवाहन पक्षी प्रेमींकडून दरवर्षी केलं जातं. मात्र दरवर्षी अनेक पक्षी या मांजामुळे जखमी झाल्याचं बघायला मिळतं. 


औरंगाबाद शहरात कारवाई पुण्यात कधी?


मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी औरंगाबाद शहर पोलिसांनी नायलॉन मांजाच्या (Nylon Manja) विरोधात मोठी कारवाई केली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी साठेबाजांवर धाडी टाकून पोलिसांनी नायलॉन मांजा जप्त केला आहे. औरंगाबाद शहरातील सिटी चौक आणि जिन्सी भागातील दोन गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकत तब्बल 15 लाखांचा मांजा जप्त करुन आरोपींना अटक केली. नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या आदेशाने शहर पोलिसांकडून प्रत्येक ठाण्यात उपनिरीक्षकांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान मकरसंक्रांतीच्या एक दिवस आधी या पथकांनी जोरदार कारवाई केली आहे. शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकूण 15 लाखांचा मांजा जप्त केला.