Pune News : जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील घोटाळ्यातील एका आरोपीच्या जामीन अर्जाला (Bail) विरोध न करण्यासाठी एक कोटी 22 लाख रुपयांची खंडणी (Extortion) घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण (Praveen Chavan) यांच्यासह तिघांवर पुण्यातील (Pune) डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर, उदय पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज झंवर यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
माझ्याकडून 1 कोटी 22 लाखांची खंडणी घेतली : सूरज झंवर
भाईचंद हिराचंद रायसोनी संस्थेतील शेकडो कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सूरज झंवर आणि त्याचे वडील सुनील झंवर हे आरोपी आहेत. सुनील झंवर यांना या प्रकरणात अटक होऊन ते दोन वर्षे पुण्यातील येरवडा कारागृहात होते. तर सूरज झंवर हा देखील काही महिने तुरुंगात होता. सूरज बाहेर आल्यानंतर तो वडिलांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होता. "राजकीय हेतूने प्रेरित होऊन माझ्या वडिलांना गुन्ह्यात अडकवलं होतं. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती. माझी कंपनी, नातेवाईक तसंच कामगारांची बँक खाती गोठवण्यात आली होती. माझ्या वडिलांना जामीन मंजूर करुन देणं तसंच गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरु करण्यासाठी ॲड. प्रवीण चव्हाण यांनी माझ्याकडे मध्यस्थ उदय पवार, शेखर सोनाळकर यांच्यामार्फत एक कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतली," असं सूरज झंवरने तक्रारीत म्हटलं आहे.
प्रवीण चव्हाण यांच्यावर स्टिंग ऑपरेशनमधून आरोप
जळगाव जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी धमकावल्याचा आरोप झाल्यानंतर महाजन यांच्यावर पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रवीण चव्हाण हे त्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत होते. मात्र प्रवीण चव्हाण यांच्यावर एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून आरोप करण्यात आल्यानंतर त्यांनी सरकारी वकील म्हणून काम करणं थांबवलं होतं. विशेष म्हणजे पुण्यातील ज्या डेक्कन पोलीस ठाण्यात सूरज झंवर आणि सुनील झंवर यांच्यावर भाईचंद हिराचंद रायसोनी प्रकरणात गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली होती, त्याच पोलीस ठाण्यात त्यांना झालेली अटक चुकीची होती असा दावा करत हा नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
VIDEO : Pravin Chavan : सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
संबंधित बातमी