पुणे : लोणावळा (lonavala) येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी आता स्कायवॉक उभारण्यासाठी तयारी सुरु करण्यात आली आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता पर्यटकांना काही वर्षात या स्कायवॉकचा आनंद घेता येणार आहे. 


पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे


अजित पवार म्हणाले की, लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. पर्यटनाला चालना देण्यासाठी लहान मुलांसाठी साहसी खेळ आणि इतर सुविधांचा समावेश असलेल्या उत्तम आराखडा महिन्याभरात तयार करावा. आराखडा तयार करताना तो निसर्गस्नेही असेल आणि पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यावी. आराखडा तयार करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत तातडीने नियोजन करण्यात यावे. 


या परिसरात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आराखडा तयार करताना पर्यटकांची सुरक्षितता आणि पर्यावरणाच्या जपणूकीला प्राधान्य द्यावे. पर्यटकांसाठी पाऊलवाट तयार करताना काँक्रीट ऐवजी दगडांचा वापर करावा. पर्यटकांना सभोवतालच्या निसर्गाचा आनंद घेता येईल, अशी रचना करण्यात यावी. परिसरात वाहनतळ तसेच पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा समावेशही आराखड्यात करावा, अशी सूचनाही त्यांनी केली.


प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये लोणावळा येथे पर्यटन सुविधा निर्माण करण्याबाबत घोषणा केली होती. लोणावळा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येतात. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथे काचेचा स्कायवॉक उभारण्याचे प्रस्तावित आहे. 4.84 हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून येथे झीप लाईनिंगसारखे साहसी खेळ, फुड पार्क, ॲम्पी थीएटर, खुले जीम आणि विवध खेळ आदी विविध सुविधा असणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार या प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


कुसूर पठारावर जागतिक पर्यटन केंद्राचा जिल्हा आराखड्यात समावेश करा


मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा. शासनामार्फत त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने आवश्यक माहिती संकलीत करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असंही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून 3 हजार मीटर उंचीवर असून साधारण 1 हजार 200 एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


इतर महत्वाची बातम्या 


Pune Ganeshotsav : देवेंद्र फडणवीसांचा आज पुण्यात 'मंडळ टू मंडळ' दौरा, दगडूशेठ चरणी होणार लीन