Pune News : पुणे (Pune) शहराने आता देशपातळीवर नावलौकिक मिळवला आहे. पुणे शहर देशातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात हरित शहर ठरलं आहे. IGBC ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टम अंतर्गत प्रतिष्ठित इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) प्लॅटिनम प्रमाणपत्र मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले आणि राजकोटनंतर भारतातील दुसरे शहर ठरले.


कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज, इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) आणि CREDAI यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अभिनंदन - ग्रीन पायोनियर्सचा सत्कार' या कार्यक्रमात पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी प्लॅटिनम प्रमाणपत्र देण्यात आला.


शहरातील विविध उपक्रमांचा अभ्यास...


IGBC ने पुणे महानगरपालिकेने हवेची गुणवत्ता सुधारणे, शहरी हरित कव्हर सिटी सॉईल कंझर्वेशन, जलाशयांचे जतन, पाण्याची कार्यक्षमता, पर्यावरणशास्त्र आणि त्याचे जतन यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास करुन हे प्रमाणपत्र दिले, तसेच सामाजिक आणि नागरिक सहभागाच्या उपक्रमांचा अभ्यास केला. पुणे महानगरपालिकेतर्फे राबवण्यात आलेल्या हवेची गुणवत्ता सुधारणे, शहरी हरित पट्टा विकास,  मृदा संवर्धन, जलाशयांचे जतन, पाण्याची उपलब्धता, पर्यावरण संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन यासह इतर विविध उपक्रमांचा अभ्यास यासाठी करण्यात आला होता. प्रकल्पाची अंमलबजावणी आणि त्याची शाश्वतता या संदर्भातील सर्व अभ्यासानंतर महापालिकेला हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं आहे.


'उत्तम राहण्यायोग्य शहर' हा टॅग पुण्याचाच...


गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर हे सर्वात राहण्यायोग्य शहर ठरत आहे. हे शहर कायमच सर्वात राहण्यायोग्य शहर राहिल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. शहरात विविध पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. ही उभारणी करताना तसेच ती केल्यानंतरही पर्यावरण संवर्धनसाठी अधिक प्राधान्य दिले जाते. पर्यावरण संवर्धन आणि विकास यामध्ये योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न महापालिकेकडून नेहमी केला जातो. येत्या काळात देखील पुणे महानगरपालिका आणि आमचे सर्व अधिकारी, कर्मचारी हे 'उत्तम राहण्यायोग्य शहर' हा टॅग पुण्याकडेच राहिल या दृष्टीने काम करत राहणार, अस विक्रम कुमार म्हणाले. 


क्रेडाई पुणे मेट्रो ही संघटना हरित विकासाला नेहमीच पाठिंबा देते. ही हरित विकासाची चळवळ शाश्वत राहावी, यासाठी शहरातील विकासक हे सर्वसमावेशक रितीने या चळवळीत योगदान देतील. महाराष्ट्रातील प्रत्येक शहर, प्रत्येक तहसील आणि प्रत्येक जिल्हा या हरित विकासाचे अनुकरण करेल आणि पुढील 10 ते 15 वर्षांत राज्यातील प्रत्येक शहर, जिल्हा, गावे ही आयजीबीसीतर्फे प्रमाणित केली जातील, असं क्रेडाईचे क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे म्हणाले.