Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील (Accident) मृतांचा आकडा वाढला आहे. मध्यरात्री दोन वाजता पुणे-बंगळुरु महामार्गावर (Pune-Bengaluru Expressway) पुण्यातील (Pune) नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ ट्रक आणि खाजगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 18 जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


कसा झाला अपघात?


ट्रकने खाजगी ट्रॅव्हलच्या बसला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. ही खासगी बस (एमएच 03 सीपी 4409) नीता ट्रॅव्हल्स कंपनीची आहे. ही बस कोल्हापूर ते डोंबिवली असा प्रवास करत होती. मध्यरात्री दोनच्या सुमारास नऱ्हे आंबेगाव परिसरात असणाऱ्या स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. बसमधील प्रवासी गाढ झोपेत असताना अपघात झाला. ज्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये लहान मुलाचाही समावेश आहे. तर 22 प्रवासी जखमी झाले असून ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. मृत आणि जखमींच्या नातेवाईंकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. 


चालकाचे ट्रकवरुन नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतं. ज्या ट्रकने धडक दिली तो मालवाहतूक करणारा मोठा ट्रक (एमएच 10 सीआर 1224) होता. या ट्रकमध्ये साखरेची पोती होती.






22 जखमींवर उपचार सुरु


अपघातात एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच यानंतर अग्निशमन दलाकडून पुणे महानगरपालिकेची 4 अग्निशमन वाहने व 1 रेस्क्यु व्हॅन व पीएमआरडीए कडून 1 रेस्क्यु व्हॅन अशी एकूण 7 अग्निशमन वाहनं घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाच्या जवानांनी बसच्या मागील बाजूची काच फोडून दोरीचा वापर करत जखमी प्रवाशांना बाहेर काढलं. जखमी अवस्थेत असलेल्या एकूण 22 जणांना पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


सुप्रिया सुळे यांची घटनास्थळाला भेट


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नऱ्हे आंबेगाव इथे मध्यरात्री झालेल्या अपघातस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करत आढावा घेतला.


VIDEO : Pune Bus - Truck Accident : ट्रकने खासगी बसला मागून धडक दिल्याने झाला अपघात, 18 गंभीर जखमी