Akashvani Pune : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसार भारतीने (Prasar Bharati) घेतला आहे. पुणे वृत्त विभागाची जबाबदारी आता छत्रपती संभाजीनगरमधील आकाशवाणी (Chhatrapati Sambhaji Nagar Akashvani) केंद्रांकडे सोपवण्यात येणार आहे. तसं प्रसार भारतीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र पुण्यातील वृत्त विभागच बंद होत असेल तर छत्रपती संभाजीनगरला बातम्या कशा पाठवल्या जाणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
केंद्रीय प्रसार भारतीने धोरणात्मक निर्णय घेतल्याने, त्याची अंमलबजावणी होत आहे. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग 19 जूनपासून बंद होत आहे. आता हेच बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन प्रसारित होईल, असं आकाशवाणीच्या पुणे केंद्राचे संचालक इंद्रजित बागल यांनी सांगितलं.
आकाशवाणी पुणे केंद्रावरुन सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी पहिलं बातमीपत्र सादर केलं जातं. त्यानंतर मग आठ वाजता, दहा वाजून 58 मिनिटं आणि अकरा वाजून 58 मिनिटं, त्याचबरोबर संध्याकाळी सहा वाजता अशी बातमीपत्रं सादर केली जातात. आता पुण्याची ही सगळी बातमीपत्रं छत्रपती संभाजीनगरवरुन प्रसारित करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे.
पूर्वीपासूनच हालचाली
पुणे वृत्त विभाग बंद करण्याच्या हालचाली यापूर्वीच सुरु होत्या. आधी भारतीय माहिती सेवेतील अधिकाऱ्यांची पुण्यातील दोन पदे अन्य केंद्रावर हलवण्यात आली. त्याचवेळी याबाबतची कुणकुण लागली होती. तसा निर्णयही मग घेण्यात आला. पुणे विभागाचं बातमीपत्र अन्यत्र हलवण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता नवा आदेश आला असून, हा विभाग आता कायमचा बंद करण्यात आला आहे.
पुणे केंद्राला सर्वाधिक श्रोते, श्रोत्यांशी घट्ट नाते
आकाशवाणी पुणे केंद्र आणि श्रोत्यांचं एक घट्ट नातं आहे. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत आकाशवाणीचे चाहते आहेत. 80-90 च्या दशकात जन्मलेल्यांसाठी तर आकाशवाणी हा हळवा कोपरा आहे. त्यामुळेच देशातील आकाशवाणीच्या विविध केंद्रांपैकी सर्वाधिक श्रोते हे पुणे केंद्रालाच लाभले. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या जवळपास 24 लाख इतकी आहे.
आकाशवाणीची बातमी, विश्वासाची हमी
आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्याच्या 5-6 वर्षानंतर म्हणजेच 1953 रोजी झाली. गेल्या 40 वर्षापासून या केंद्रावरुन नियमित बातमीपत्र प्रसारित होत होत्या. आकाशवाणीची बातमी म्हणजे विश्वास, आकाशवाणीची बातमी म्हणजे खात्री, आकाशवाणीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी असं चित्र आजही आहे.
तोकड्या मनुष्यबळावर कामकाज
आकाशवाणी पुणे केंद्राचं काम सध्या तोकड्या मनुष्यबळावर चालत होतं. केंद्राचा प्रभारी माहिती अधिकारी, एकमेव वृत्तनिवेदक आणि हंगामी वृत्तसंपादक यांच्या नेतृत्त्वात हंगामी वार्ताहरांच्या जोरावर आकाशवाणी पुणे केंद्राचं बातमीपत्र सुरु होतं. मनुष्यबळ तोकडं असलं तरी बातम्यांची कमतरता इथे कधीच जाणवली नाही. मात्र आता हे केंद्र कायमचं बंद होत आहे.