Mumbai Pune Express Highway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघातानंतर खोळंबलेली वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेन आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लेन पुन्हा सुरु करण्यात आल्या आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील खंडाळा घाटात टॅंकर पलटी होऊन आग लागली होती. ही आग प्रचंड भीषण होती. आग लागल्यावर आगीची झळ ब्रिज खाली गेली आणि ब्रिज खालच्या गाड्यादेखील  पेटल्या होत्या. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल  पाच तासानंतर य़ा आगीवर नियंत्रण मिळवून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.


पाच तास रेस्क्यू ऑपरेशन... 



दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी हा अपघात घडला. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमनदलाने बचावकार्य सुरु केलं होतं.  या टँकरची आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडला फोमच्या गाडीची आवश्यकता होती. मात्र IRB यंत्रणा पाण्याच्या टँकरने आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी आग चांगलीच धुमसल्याचं पाहून यंत्रणांनी पुन्हा पाण्याचा मारा सुरु केला. हे सगळं सुरु असतानाच मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आग आटोक्यात आली. आग आटोक्यात आणणं अग्निशमन दलाच्या जवानांपुढे मोठं आव्हान होतं. पावसामुळे हे काम सोपं झालं. एवढं असूनही कुलिंगसाठी फार वेळ लागला. कुलिंग झाल्यावर क्रेनच्या साहय्याने टॅंकर रस्त्यांच्या बाजूला करण्यात आला. त्यानंतर टॅंकरचा झालेला कोळसा कर्मचाऱ्यांनी उचलला आणि तब्बल पाच तासांनी हे रेस्क्यू ऑपरेशन संपलं.


वाहतूक कोंडीने नागरिक हैराण


हे रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. तब्बल पाच तास रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. प्रवासी पाच तास वाहतूक कोंडीत अडकले होते. अनेक प्रवाशांना कामानिमित्त पुणे किंवा मुंबई गाठायचं होतं. मात्र या अपघातामुळे अनेकांची कामं रखडली. त्यासोबतच काही नागरिक हजला जाण्यासाठी निघाले होते. त्यांनी तब्बल सहा लाखांचं तिकीट काढलं होतं. मात्र या वाहतूक कोंडीत तेदेखील सापडले. पाचवाजेपर्यंत मुंबई गाठली नाही तर त्यांचं सहा लाखांचं नुकसान झाल्याची भीती होती. मात्र ते या अपघातामुळे मुंंबईत पोहचू शकले नाहीत. आता त्यांना सहा लाख पाण्यात जाण्याची भीती कुटुंबीयांना वाटू लागली आहे.


 स्थानिक नागरिक बनले देवदूत...


या सगळ्या अपघातादरम्यान मात्र प्रवाशांसाठी स्थानिक नागरिक धावून आले. त्यांनी प्रवाशांना पाणी आणि बिस्किटांचं वाटप केलं. त्यानंतर काही उपाशी प्रवाशांसाठी जेवणदेखील मागवलं. हे सगळं जेवण ब्रिजच्या खालून दोरीने ओढून ब्रिजवर खेचत असल्याचा व्हिडीओदेखील  व्हायरल झाला आहे.


 चार जणांचा मृत्यू, गुन्हा दाखल नाही


या अपघातानंतर अजून कोणावरीही गुन्हा दाखल झालेला नाही.  रितेश महादु कोशीरे (वय 17 रा. कुणेगाव ता. मावळ जि. पुणे), कुशाल केलास वरे (वय 9 वर्षे रा. तुंगार्ली लोणावळा मुळ रा. राजमाची उदयवाडी ता. मावळ जि. पुणे), सविता केलास वरे (वय 35 सदया रा. तुंगार्ली लोणावळा मुळ रा. राजमाची उदयवाडी ता. मावळ जि. पुणे) अशी मृतांची नावं आहेत. टॅकर मधील दोन पुरुषांची अजुनही ओळख पटलेली नाही.