पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यावरुन वाद सुरु झाला आहे. परंतु पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा आजचा रोजा सोडण्यात येणार आहे. पुण्यातील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिरात आज (15 एप्रिल) संध्याकाळी सव्वा सहा वाजता याचं आयोजन करण्यात आलं आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र माळवदकर आणि भाई कात्रे यांनी या रोजा इफ्तारचे आयोजन केलं असून ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याशिवाय राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, शिक्षण महर्षी पी ए इनामदार, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस आयुक्त प्रियांका नारनवरे, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोयेकर यांची देखील प्रमुख उपस्थिती असेल.


इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला 3 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या संपूर्ण महिन्यात मुस्लिम लोक सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. आज देशभरात रमजानचा तेरावा रोजा आहे. राज्यभरात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा वादाच्या पार्श्वभूमीवर आजचा रोजा सोडण्यासाठी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तारचं आयोजन केलं आहे. साखळीपीर तालीम राष्ट्रीय मंदिरात हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिमांचा रोजा सोडला जाणार आह.


पुण्यातील सोमवार पेठेतील या ठिकाणी मुस्लीम पीराचा दर्गा आणि हनुमान मंदिर एकत्रित आहेत. म्हणून या तालमीला साखळीपीर तालीम म्हटलं जातं तर हनुमान मंदिराला राष्ट्रीय हनुमान मंदिर हे नाव आहे. मागील 34 वर्षांपासून इथे हनुमान जयंती दोन्ही समाजाकडून एकत्रित साजरी होते.


रमजान महिन्याचे महत्त्व
रमजानचा महिना इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना मानला जातो. या संपूर्ण महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी अन्न आणि पाणी घेत नाहीत. उपवास करण्यासोबतच या संपूर्ण महिन्यात आपले विचारही शुद्धता ठेवावे लागतात. आपल्या शब्दांनी कोणाचेही नुकसान न होणार नाही हेही आवश्यक असते. हा महिनाभर शरीराच्या शुद्धतेसाठी विशेष काळजी घेतली जाते.


रमजान महिन्यात उपवास का केला जातो?
रमजान हा महिन्यामध्ये इस्लाम धर्माचे पवित्र प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या समक्ष पवित्र ग्रंथ कुराणचा पहिला श्लोक अनावरण करण्यात आला होता. तेव्हापासून इस्लाममध्ये हा महिना पवित्र मानून महिनाभर उपवास करण्याची परंपरा सुरु झाली. उपवास हे इस्लाम धर्माच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे. उपवास, नमाज, दान, श्रद्धा आणि मक्काची हज यात्रा ही इस्लाम धर्मातील पाच तत्त्वे आहेत. मुस्लिम बांधवाच्या जीवनात या पाच तत्त्वांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.